Monday 11 April 2016

New singers & music directors attempt Tujya Chahuli

नव गायक संगीतकारांचा स्तुत्य उपक्रम - तुझ्या  चाहुली
जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रकाशन


ऋषिकेश रानडे, मंगेश बोरगावकर, अनिरुद्ध जोशी, रणजीत पराडकर, प्रसाद इनामदार आणि मंदार जोशी या तरुण गीतकार, गायक, संगीतकारांनी मिळून "तुझ्या चाहुली" या अल्बमची संगीतमय भेट तरुणाईला दिली आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय असलेल्या "युनिव्हर्सल म्युझिक कंपनी"ने  आपला डिजिटल प्लॅटफॉर्म या आठ गीतांच्या अल्बमसाठी उपलब्ध करून दिला आहे.

"तुझ्या चाहुली" हा अल्बम जागतिक पातळीवर पोहचविण्याचा मनसुबा बांधत युनिव्हर्सलच्या राजन प्रभू यांनी ही गीते जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा निश्चय करीत  "युनिव्हर्सल डिजिटल"वर प्रकाशित केली आहेत. या अल्बमची निर्मिती  नव संगीतकार मंदार जोशी यांनी केली आहे. त्यांनीच  संगीतबद्ध केलेल्या या अल्बमला जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत संयोजन लाभले असून पत्कींच्या हस्ते हा अल्बम तरुणाईला बहाल करण्यात आला आहे. अतिशय मेलोडिअस असलेला हा अल्बम खास १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून प्रदर्शित केला असला तरीही तो ३६५ दिवस दररोज ताजा तजेला देणारा असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.

"तुझ्या चाहुली" या अल्बममध्ये एकूण आठ गाणी आहेत. 'जाणवाव्या कितीदा', 'आठवांची आठवांशी भेट', 'मी कधीच झालो नाही', 'कसा आज माझा ठोका चुकावा' ही गीते ऋषिकेश रानडे यांनी स्वरबद्ध केली आहेत.  'आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला' हे गीत अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजातील गीत रणजीत पराडकर यांनी लिहिले आहे. तर 'हळुवारशा क्षणांना' आपल्या मखमली स्वरांचे कोंदण मंगेश बोरगावकर या आघाडीच्या गायकाने दिले असून गीतकार रणजीत पराडकर यांनी शब्दावली फुलवली आहे. 'दिसताच तू प्रिये मी' व 'सारीच आसवे ही' ह्या गीतांना ऋषिकेश रानडे यांचा स्वर लाभला असून गीतकार प्रसाद इनामदार यांच्या लेखणीतून यांची निर्मिती झाली आहे. ह्या अल्बम मधील आठही गीतांना संगीतकार मंदार जोशी यांनी संगीतसाज चढवला आहे. जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी या आल्बमसाठी संगीतसंयोजन करून नव्या तरुणाई तील हिऱ्यांना नवे पैलू पाडण्याची किमया साधली आहे. 

आपल्या पहिल्या अल्बमला जेष्ठ संगीतकार अशोक पत्कीकाकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे हा अल्बम अधिक मेलोडिअस झाल्याचे सांगत गाण्यांची लहानपणापासून आवड होती. तबला आणि हार्मोनियम चे ज्ञान होते पण कधी संगीतकार होईल असा विचार केला नव्हता. २०१५ च्या शांघाय मधील गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात ज्येष्ट संगीतकार अशोक पत्की यांच्या सोबत गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पत्की काकांना whatsApp वरून माझ्या रचना पाठवत गेलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हा अल्बम आज रसिकांसाठी उपलब्ध करू शकलो आहे.


No comments:

Post a Comment