Monday 22 August 2016

Evergeen Sachin Pilgaonkar

एव्हर ग्रीन सचिन " भव्य दिव्य शो येतोय

                              सचिन पिळगांवकर. सिनेसृष्टीतील असामान्य व्यक्तिमत्व. मराठी चित्रपट सृष्टीतील पितामह  राजा परांजपे यांच्या छायेखाली ज्यांनी लहानपणी चित्रपट आणि अभिनयाचे धडे गिरविले तो सचिन. जसजसा तो मोठा होत गेला तसतसा त्यांच्याकडून अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या सचिनने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत धडाकेबाज कामगिरी करीत आपले नाव सहजतेने कोरले असा सचिन. वाहिनी क्षेत्रात सुद्धा आपले स्थान सिद्ध करणारा सचिन. प्रतिभेला मर्यादा नसतात हे अष्टपैलू सचिन पिळगावकरांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. 

                               अशा सचिनचा  " एव्हर ग्रीन सचिन " हा भव्य दिव्य शो १६ सप्टेंबर  भाईदास सभागृहात सादर होत आहे. सचिनने आजपर्यँत मराठी हिंदी  चित्रपटातील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाने भुरळ घातली आहे.त्याने निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही आपली कल्पकतेचा ठसा मराठी चित्रपटसृष्टीत उमटविलेला आहे. त्याच्या नृत्य कौशल्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. म्हणूनच तो वाहिनीवरच्या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका बजावताना कलाकारांना आणि प्रेक्षकांना  आपलासा वाटतो. अशा  सचिनचा " एव्हर ग्रीन शो " येतोय. 

                           सचिन पिळगावकर याने चित्रपट सृष्टीची ५० वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत. आज या घडीला कुठलीही मराठी -हिंदी वाहिनी लावली तर त्याचा मराठी - हिंदी चित्रपट पाहण्यास मिळतो. असे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसते. त्यामुळे बिग बी सारखे व्यक्तिमत्व सचिनचे गुणगान करताना आपण पाहतो आणि मराठी माणूस म्हणून प्रत्येकास त्याचा अभिमान वाटतो. सचिनचे लोभस व्यक्तिमत्व जसे सगळ्यांना आपलेसे करते तसेच त्याचे गाणे,  नृत्य पाहत राहावेसे वाटते. मराठीचित्रपट सृष्टीत सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकुट होते. त्यांनी नुकतेच प्रेक्षकांचे  मनोरंजनच केले नाही तर मराठी चित्रपट सृष्टीला सोनियाचे दिवस बहाल केले. त्याचे क्रेडिट अर्थातच सचिनलाच द्यावे लागेल.          

                          हा आगळा वेगळा शो असेल.सचिनच्या चित्रपट  कारकिर्दीच्या ५० वर्षाची वाटचाल सादर करताना जी  चित्रपटातील गाणी हिट झाली ती तर या शोमध्ये असणारच आहेत पण त्याहीपेक्षा सुश्राव्य बॉलिवूडची मेलडी रसिकांना ऐकण्यास मिळणार आहेत. सचिन ती गाणार असून त्याच्या अनिरुद्ध जोशी आणि धरना पावा सहगायक - गायिका असणार आहेत.   तसेच काही निवडक हिंदी चित्रपटातील नृत्य बॉलिवूडचे नृत्य कलाकार सादर करतील. सचिन एव्हरग्रीन शो हा सर्व नाट्यगृहात सादर होणार नसून काही विशिष्ट अलिशान नाट्यगृहात तो सादर होईल. एकंदर ४० कलाकार त्यात सहभागी होणार आहेत.                     
                                अभिनय निर्मित या शो ची निर्मिती शांताराम मनवे यांनी केली असून भव्य दिव्य स्वरूपात दृक-श्राव्य माध्यमातून तो सादर होणार आहे. यात सचिन यांनी साकारलेल्या चित्रपटातील दृश्य याचा समावेश असेल. २२ते ३० कलाकारांचा वाद्यवृंद सचिन याला साथ देणार आहेत. भव्य रंगमंचावर अभिनय संस्था नेत्रदीपक नेपथ्याची उभारणी करणार आहे. पल्लवी शेट्टी हिचे खुमासदार निवेदन असणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांचे असून  " एव्हर ग्रीन सचिन " या शो मध्ये प्रेक्षकांना सबकुछ सचिनचेच दर्शन घडणार आहे.या शो त ४० कलाकार भाग घेताहेत आणि ते यशस्वी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचललेले आहे.                     

No comments:

Post a Comment