Monday 10 October 2016

REVIEW - Mirzya




परिक्षण -  मिर्झया

हर्षदा वेदपाठक



मिर्झा साहेबान या पंजाबी लोककथेमधिल प्रेमाच्या त्यागावर मिर्झया हा चित्रपट आधारीत आहे. आज आणि काल या दोन कालखंडाला पुनर्जन्म या कथेने जोडलं गेलं आहे. मिर्झा आणि साहेबान यांची प्रेमकथा, त्याला असलेला घरच्यांचा असलेला विरोध आणि सरतेशेवटी या प्रेमी युगलांनी केलेली आत्महत्या हा विषय मिर्झया या चित्रपटात आहे.



लेखक दिग्दर्शक गुलजार यांनी मिर्झया या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहीली असुन, कालची प्रेम कहाणी आणि आजची प्रेमकथा यांची सरमिसळ त्यांना जमलेली नसल्याचे दिसुन येते. मिर्झयासाठी त्यांनीच गीतलेखन केले आहे. गुलजार यांच्या गीतांना शंकर ऐहसान लॉय यांनी संगीतबध्द केलं आहे. गीतं श्रवणीय असुन ती कथानकाला पुढे नेतात. मात्र चित्रपटभर इतकी गाणी आहेत की कथानकामधिल गहनताच कमी होऊन जाते.



हर्षवर्धन कपुर आणि सयामी खेर या दोन नवकलाकारांचे या चित्रपटाद्वारे पदार्पण होत असुन  दोन्ही कलाकारांनी, आपली भुमिका प्रामाणीकपणे निभावण्याचा प्रयत्न केला आहे.



राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी एका चांगल्या कथेला काल आणि आजमध्ये बांधताना इतके फ्लॅशबॅक दिले आहेत की, एकसंध कथेमध्ये नेमकं काय सुरु आहे ते समजणे कठीण जाते. शिवाय काल आणि आज दाखवताना त्यामधिल दृष्यांची जुळणी मात्र चुकीच्या जागी केलेली दिसुन येते. त्यामुळे फिसकटलेल्या कथेला आणखीनच विस्कळीतपणा येतो. राकेश मेहरा यांच्या सारखा सिध्दहस्त दिग्दर्शक आणि गुलजार यांच्या सारख्या जाणकार लेखक दिग्दर्शकाचे उत्तम कथानकाला सादर करण्यात आलेले अपयश नवकलाकांराच्या माथी देखिल बसणार आहे, हे मिर्झया या चित्रपटात दिसुन येते. उत्तम लोकेशनला, दर्दी कॅमेरा सर्वेत्तमरीत्या टिपतो. त्यात भर घालते ती व्हि.एफ.एक्सची जादु.



मिर्झयाच्या एकंदरीत अशक्तपणाचा फायदा या आठवड्यात इतर स्पर्धक नसल्याने धोनी या चित्रपटाला होईल यात शंका नाही. 




No comments:

Post a Comment