Sunday, 3 April 2016

Maharashtra State award for V.N.Mayekar and Alka Kubal

चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार
व्ही.एन.मयेकर आणि अलका कुबल यांना घोषित
शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही.एन.मयेकर यांना आणि व्ही.शांताराम विशेष योगदान लोकप्रिय अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार ५ लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्काराचे रु.3. लक्ष रुपयाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने श्री.मयेकर आणि श्रीमती कुबल यांनी निवड केली. श्रीमती श्रावणी देवधर, श्री भरत जाधव, श्री शाम भुतकर, श्री गजेंद्र अहिरे या समितीच्या सदस्यांनी या पुरस्कारांसाठी श्री व्ही.एन.मयेकर व श्रीमती अलका कुबल यांची शिफारस केली होती.

      प्रसिद्ध चित्रपट संकलक जी.जी.मयेकर यांना गुरुस्थानी मानणाऱ्या श्री व्ही.एन.मयेकर यांनी आपल्या ४५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. सर्वश्री राहुल रवेल, राजकुमार संतोषी, सुरज बडजात्या, महेश मांजरेकर ही त्यापैकी काही नावे आहेत. घायल, घातक, दामिनी, वास्तव,अस्तित्व, मी तुझीच रे या त्यांच्या चित्रपटांच्या उत्कृष्ट संकलनाबद्दलची पारितोषिके श्री व्ही.एन.मयेकर यांना मिळाली आहेत. पसंत आहे मुलगी, जन्मदाता मी तुझी तुझीच रे या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

      ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अलका कुबल हया मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके यासारख्या आघाडीच्या नायकांसोबत त्यांनी मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘चक्र’ या चित्रपटाव्दारे अलका कुबल यांचे रुपेरी पडदयावर पर्दापण झाले. त्यापाठोपाठ त्यांनी तुझ्यावाचून करमेना, दुर्गा आली घरा, माहेरचा आहेर, देवकी,नवसाचं पोर, स्त्रीधन असे कौटुंबिक चित्रपट केले.  श्रीमती कुबल यांनी चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी स्वत: पदरमोड करुन त्यांना अबोलपणे मदत केली आहे.


No comments:

Post a Comment