Monday, 11 April 2016

Evergreen Asha Bhosle is ready with her new pop album 82



चिरतरुण @ 82

केव्हा तरी पहाटे, उष:काल होता होता, मी मज हरपून बसले गं, मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी... या सर्व गाण्यांमध्ये साम्य काय? शब्दांची दैवी देणगी लाभलेले गझलकार सुरेश भट यांचे शब्द आणि दैवी स्वरांचं लेणं लाभलेल्या आशा भोसले यांचा मधाळ स्वर यांच्या अद्वैतातून जन्मलेली ही गाणी मराठी संस्कृतीचा चिरकाल ठेवा आहेत. ‘सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?’ असा आर्त सवाल करणाऱ्या आशाताई आज वयाच्या ८२व्या वर्षी, सहस्त्रचंद्रदर्शानंतरही तितक्याच तरुण आवाजात पुन्हा सुरेश भटांच्या गझला घेऊन रसिकांसमोर येत आहेत. ‘82’ मराठी पॉप अल्बम असंच या अल्बम च नाव असून सुरेश भटांच्या आशयघन, आर्त, घनव्याकूळ गझलांना पॉप, रेगे, ब्लूज्, रॉक, बॅलाड, सोलच्या झिंगबाज आवरणात लपेटून मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने हा अल्बम सजवला आहे.

सुरेश भटांच्या सिद्धहस्त, ओघवत्या लेखणीतून उतरलेल्या सहा गझलांचा या अल्बममध्ये समावेश आहे. ओठ, आसवांचे, बरसून, हा असा चंद्र, तोरण आणि दिवस हे जाती कसे या सुरेश भटांच्या सहा गजला या अल्बमसाठी निवडण्यात आल्या आहेत. मंदार आगाशे या तरुण संगीतकाराने या गझलांना आपल्या संगीताने सजवलं आहे.

यासंदर्भात आशाताई म्हणाल्या, “सुरेश भट यांच्याशी अनेक वर्षं माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याविषयीच्या असंख्य आठवणी आहेत. या अल्बमच्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सुरेश भट यांच्या शब्दांची ताकद काय आहे, हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या अल्बमच्या निमित्ताने ती ताकद पुन्हा अनुभवता आली. मंदारच्या संगीताची जी पॉप अँड रॉक शैली आहे, त्या शैलीत माझ्या आवाजात आपल्या गझला रेकाॅर्ड व्हाव्यात, अशी भट साहेबांची खूप इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण होत असल्याचा आनंद असला तरी भट साहेब या गझला ऐकायला आपल्यात हवे होते.”

यासंदर्भात मंदार म्हणाला, “१९९४ साली प्रथम सुरेश भट यांना भेटलो तेव्हापासूनच माझ्या इंग्लिश पॉप संगीताच्या शैलीत आणि आशाताईंच्या आवाजात सुरेश काकांच्या गझलांची ध्वनिफीत करावी, अशी त्यांचीच इच्छा होती. आज सुरेश काका हयात नाहीत, पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. ह्या अल्बमचं म्युझिक अॅरेंजिंग डेरेक ज्यूलियन आणि रिदम अॅरेंजिंग रवी वेदांत यांनी केलं आहे.”
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या चित्रपटातील ‘खुळ्या खुळ्या रे पावसा’ हे मंदारचं पहिलं गाणं. पंडितजींनी स्वत: बोलावून मंदारला हे गाणं करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याने १९९६ मध्ये प्रथमच सुरेश भट यांच्या गझलांचा समावेश असलेल्या ‘अचानक’ या ध्वनिफितीची निर्मिती केली होती.
‘82’ मराठी पॉप या अल्बमच्या निमित्ताने सुरेश भट आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी सुवर्णसंधी म्हणून एका अनोख्या स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं आहे. खास त्यासाठीच www.82pop.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून त्यावर या स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. या अल्बममधील गाणी फ्री डाऊनलोडसाठी या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या गाण्यांवर चाहत्यांनी व्हिडिओ तयार करून या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. आशाताई स्वत: त्यांना आवडलेल्या व्हिडिओंची निवड करून त्यानंतर व्यावसायिक पद्धतीने अंतिम म्युझिक व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment