बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार विशाल-शेखर या जोडीतील विशाल दादलानी यांनी आजवर मराठीत दोन सुपरहीट सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. एक ‘बीपी’ या चित्रपटातील “करूया कल्ला...कल्ला...कल्ला...” आणि दुसरे ‘टाइमपास 2’ मधील “वाऊं... वाऊं... वाऊं... दिल अपना दर्या है...” ही दोन्ही गाणी त्या त्या चित्रपटांसोबत चांगलीच गाजली. आता विशाल दादलानी यांनी मराठीत ‘ही रात्र माझी मैत्रीण…’ हे तिसरे गाणे गायले आहे, तेही एकही पैसा न घेता. आश्चर्य वाटलं ना? हो...एकही पैसा न घेता आणि ते ज्या सिनेमासाठी गायले आहे त्या सिनेमाचे मात्र नाव आहे...पैसा पैसा.
हिंदी टेलिव्हीजन दुनियेतील नावजलेले रंगभूषाकार शिवविलाश चौरसिया हे गायक विशाल दादलानी यांचे खाजगी मेकअप आर्टिस्ट. शिवविलाश यांनी त्यांच्या पैसा पैसा या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल कल्पना देताच विशालने चित्रपटातील एक गाणे कोणताही मोबदला न घेता गाण्याचे वचन दिले आणि पूर्णही केले. इतकंच नव्हे तर हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठीचा सर्व खर्चही त्याने स्वत: केला आहे. शिवविलाश चौरसिया यांच्या चहावाला ते मेकअप आर्टीस्ट या खडतर प्रवासाची जाण असल्याने आणि त्यांची कामातील सचोटी तसेच इमानदारी यामुळे ते केवळ खाजगी मेकअप आर्टिस्ट नव्हे तर विशाल दादलानींचे जवळचे मित्र बनले. स्वत: कायम अंधारात राहून दुसऱ्यांचा चेहरा उजळून टाकणाऱ्या आपल्या मित्राचे यशस्वी सिनेनिर्माता बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशाल दादलानी यांनी पैसा पैसा चित्रपटाचे प्रमोशन करण्याचेही मान्य केले आहे.
पैसा पैसा चित्रपटातील ‘ही रात्र माझी मैत्रीण…’ हे रॉक प्रकारातील गाणे विशाल दादलानी यांनी अफलातून गायले आहे. मुंबईकरांना खुणावणाऱ्या नाईट लाईफवर आधारीत हे गाणे असून अवघ्या चोवीस वर्षांचा रॉकस्टार संगीतकार सोहम पाठक याने या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘बीपी’ आणि ‘टाइमपास 2’ प्रमाणे हे गाणे आणि चित्रपट दोन्ही सुपरडूपर हीट होणार, असा विश्वास गायक विशाल दादलानी यांनी व्यक्त केला आहे.
अभिनेता सचित पाटील, स्पृहा जोशी, मिलिंद शिंदे आणि आशिष नेवाळकर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या पैसा पैसा या चित्रपटाचे ॲडफिल्म मेकर जॉजी रेशल जॉब यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 13 मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment