मराठी रंगभूमीविषयी आवड असणारा तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. साहित्य कला, नाट्यक्षेत्राचा मी सुद्धा रसिक असून हे क्षेत्र पुढे नेऊन मराठी रंगभूमीची व्याप्ती व लोकप्रियता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभाचे रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, बाल नाट्यकार श्रीमती मीनाताई नाईक, नेपथ्यकार बाबासाहेब पार्सेकर, अभिनेते रमेश वाणी, केश व रंगभूषाकार कृष्णाजी बोरकर, उदय तांगडी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदींच्या हस्ते 55व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या, 13व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या आणि 28व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
नाट्यस्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा देऊन श्री. तावडे पुढे म्हणाले, नाट्य स्पर्धसाठी तसेच विजेत्या उत्कृष्ठ नाटकांची निवड करताना या क्षेत्रातील तज्ज्ञ व शासनाचे प्रतिनिधी यांच्यात मतभिन्नता निर्माण होऊ नये यासाठी पाच जणांची समिती नेमून त्याबाबतचे नियम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील तसेच छोट्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सात विभागीय केंद्रांमध्ये एकांकिका महोत्सव घेण्याबाबतचा शासनाचा प्रयत्न आहे.
यावेळी व्यावसायिक नाट्य स्पर्धा नाट्य निर्मिती प्रथम पारितोषिक रुपये 5 लाख, सोनल प्रॉडक्शन संस्थेच्या ‘डोंट वरी बी हॅपी’ या नाटकाला देण्यात आले. तसेच हौशी मराठी नाट्य स्पर्धा प्रथम पारितोषिक रुपये 3 लाख, महानगरपालिका कर्मचारी कलावंत संस्था,कला साधना या संस्थेच्या ‘असुरवेद’ या नाटकाला देण्यात आले. बालनाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये 50 हजार,ज्ञानदिप कलामंच, ठाणे या संस्थेच्या ‘डराव डराव’ या नाटकाला तसेच संस्कृत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये 50 हजार, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या ‘अक्षगानम’ या नाटकाला तसेच संगीत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये 75 हजार, देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाला तसेच हिंदी स्पर्धा स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रुपये 50 हजार, बेस्ट कला आणि क्रिडा मंडळ मुंबई, या संस्थेच्या ‘महामंत्री’ या नाटकाला देण्यात आले.
No comments:
Post a Comment