Thursday, 29 October 2015

Shahid Bhagat Singh's diary in Marathi Now

' शहीद भगतसिंहांची जेल डायरी' आता मराठीत

* शनिवारी शिक्षणमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार प्रकाशन सोहळा *

प्रखर देशभक्त , स्वातंत्र्य  लढयातील धगधगता अंगार आणि तमाम क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणजे शहीद भगतसिंह .

 भगतसिंहांचे जीवनकार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी असले तरी त्यांचे विचार म्हणावे तितक्या प्रमाणात मराठी वाचकांपर्यंत पोहोचले नव्हते. पण आता ही अडचण दूर होणार आहे. 'शहीद भगतसिंहांच्या जेल डायरी' च्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांच्या हस्ते होणार आहे.

          ब्रिटीश असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकल्याप्रकरणी 8 एप्रिल 1929 रोजी भगत सिंहांना अटक करण्यात आली. जवळपास अडीच वर्षे ते लाहोरच्या तुरुंगात होते. या काळात त्यांनी प्रचंड ज्ञानसाधना केली . जगभरातील क्रांतिकारकांचा, चळवळींचा, विचारवंतांचा , समाजवादाचा - साम्राज्यवादाचा अभ्यास केला आणि या सर्वांचा संदर्भ घेवून भगतसिंहांनी 'जेल डायरी' लिहिली . मात्र भगतसिंहांच्या मूळ इंग्रजी हस्ताक्षरात असणारी ही डायरी मराठी वाचकांपर्यंत पोहोचणे केवळ दुरास्तवच होते. पण इतिहासाचे अभ्यासक असणारे अभिजीत भालेराव यांनी 2 वर्षांच्या अथक प्रयत्नांनी या डायरीचा मराठी अनुवाद केला आहे. 'जीवनरंग'तर्फे प्रकाशित होणा-या या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भगतसिंहांच्या मूळ हस्ताक्षरासहीत ही डायरी वाचकांच्या भेटीसाठी येत आहे.

शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी शिक्षणमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत 20 - डाऊन टाऊन हॉल , ईरॉस थिएटर बिल्डिंग , चर्चगेट , मुंबई येथे सायंकाळी 6.30 वाजता या डायरीचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

*मराठीत 'बुक ट्रेलर'चा प्रयोग *

 " जेल डायरी"च्या प्रकाशनानिमित्त डायरीचा युथफुल 'ट्रेलर' रिलीज़ करण्यात आला आहे. मराठी पुस्तकविश्वात पहिल्यांदाच असा 'बुक ट्रेलर'  चा प्रयोग करण्यात आला असून ही डायरी तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अनुवादक अभिजीत भालेराव यांनी व्यक्त केला.
यु ट्यूब वर  '' The Jail diary of Bhagat Singh in Marathi '' टाईप करुन किंवा https://youtu.be/jL22uf6TgaI  या लिंक वर जाऊन तुम्ही हा जबरदस्त ट्रेलर पाहू शकता .


No comments:

Post a Comment