जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलतर्फे २०२३ मधील भरगच्च कार्यक्रमाची रुपरेषा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १० दिवसांच्या कालावधीत २५० हून अधिक सिनेमे या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या वैविध्यपूर्ण महोत्सवात ४० हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स पार पडणार आहेत. तर ४५ आशिया प्रीमिअर्स आणि ७० हून अधिक दक्षिण आशिया प्रीमिअर्स पार पडतील. विशेष म्हणजे यंदा दक्षिण आशिया विभागासाठी विक्रमी १००० हून अधिक सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. दक्षिण आशियातील समकालीन सिनेमे आणि सिनेमाच्या माध्यमातून उमटणाऱ्या नव्या जाणीवांवर भर दिला जाणार आहे. यंदाच्या या महोत्सवात सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे दक्षिण आशिया स्पर्धा. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियातून जगभरात पोहोचलेल्या सिनेकर्त्यांसाठी, त्यांच्यातील प्रतिभेसाठी महत्त्वाचे केंद्र बनण्याचे या महोत्सवाचे नवे उद्दिष्ट या स्पर्धेतून दिसून येते. नव्या दमाचे, वेगळे समकालीन दक्षिण आशियाई सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. भारत, बांग्लादेश, भूतान आणि नेपाळ तसेच यूके आणि जर्मनीत वास्तव्यास असणाऱ्या या भागातील उदयोन्मुख फिल्ममेकर्स तसेच दुसऱ्यांदा सिनेमा बनवणाऱ्यांचे १४ सिनेमे यात आहेत. शिवाय, स्पर्धेबाहेरच्या विभागातही ४६ दक्षिण आशियाई सिनेमांचा (२२ फिचर फिल्म+ २४ नॉन-फिचर) समावेश आहे. या सर्वच सिनेमांतून दक्षिण आशियातील वैविधता आणि संपन्न कलागुणांना वाव दिला जाणार आहे. म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेशातील सिनेमांचा या विभागात समावेश आहेच. शिवाय, या देशांमधून ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, यूके, पोलंड आणि स्पेनमध्ये स्थलांतरित झालेल्या सिनेकर्त्यांच्या दृष्टिकोनातून बनलेले सिनेमेही यात आहेत.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या महोत्सवातील मंडळाचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. अनुपमा चोप्रा, फरहान अख्तर, राणा दुग्गुबती, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्य मोटवाने, झोया अख्तर, रोहन सिप्पाी आणि अजय बिजली यांनी जागतिक आणि दक्षिण आशियाई सिनेमांची या कार्यक्रमातील यादी जाहीर केली. अत्यंत विचारपूर्वक हे सिनेमे निवडण्यात आले आहेत.
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या आर्टिस्टिक डायरेक्टर दिप्ती डिकुन्हा म्हणाल्या, “दक्षिण आशिया आणि जगभरात पसरलेल्या दक्षिण आशियाई लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या, त्यांच्या जाणीवा मांडणाऱ्या सिनेमांवर भर देणारी एक नवी परिसंस्था या महोत्सवाच्या माध्यमातून उभी करणं हा आमचा उद्देश आहे. या दिशेने प्रयत्न करताना पहिल्याच वर्षी दक्षिण आशिया विभागात आम्हाला इतके वैविध्यपूर्ण सिनेमे आणणं शक्य झालं याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. आमची बांधिलकी निव्वळ सिनेमे दाखवण्याच्या पलिकडे आहे. मुंबईत जगातील सर्वोत्तम सिनेमे उपलब्ध करून देतानाच कल्पना आणि विचारांचे आदान-प्रदान, सहकार्य आणि व्यवसाय संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न असेल.”
या महोत्सवातील वर्ल्ड सिनेमा किंवा जागतिक सिनेमा विभागात ३५ हून अधिक देशांमधील ९० हून अधिक सिनेमांचा समावेश आहे. जगभरात यंदा पार पडलेल्या विविध चित्रपट महोत्सवांमधील काही बहूचर्चित सिनेमेही इथे पाहता येतील. पाल्मे डी’ऑर पुरस्कार विजेता जस्टिन ट्रिएट यांचा अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, ऑस्करपर्यंत पोहोचलेला ब्रॅडले कुपर यांचा मॅस्ट्रो, सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडिअन्स अॅवॉर्ड पटकावलेला मॅडलेन गॅविन यांचा बीयाँड युटोपिया असे एकाहून एक सरस सिनेमे यंदा मामी महोत्सवात पाहता येतील. शिवाय पेड्रो कोस्टा यांचा द डॉटर्स ऑफ फायर, हिरोकाझु कोरे-एडा यांचा मॉन्स्टर, हाँग सँग-सू यांचा इन अवर डे, पेड्रो अल्मोडोवर यांचा स्ट्रेंज वे ऑफ लाईफ, केन लोच यांचा द ओल्ड ओक, अकी कौरीस्माकी यांचा फॉलन लीव्ह्स आणि अॅलिस रोहरवॉचर यांचा ल शिमेरा हे सिनेमेही यात आहेत.
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या इंटरनॅशल प्रोगॅमिंग विभागाच्या प्रमुख अनु रंगचर म्हणाल्या, “महोत्सवात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही अत्यंत सुंदर सिनेमे निवडले आहेत. बहूचर्चित आणि नावाजलेल्या सिनेमांसोबतच काही असे सिनेमेही आहेत जे त्यांच्या-त्यांच्या देशातून अॅकॅडमी अॅवॉर्ड्ससाठी नामांकित होते. काळाच्या ओघात महान सिनेमे म्हणून ओळख घडवण्याची ताकद या सिनेमांमध्ये आहे. अनेक उत्तमोत्तम सिनेमे भारतात स्वतंत्रपणे प्रदर्शित होण्याची शक्यता फारच कमी असते. असे निवडक सिनेमेही आम्ही आणले आहे. या सिनेमांमुळे आश्चर्यचकित होण्यास उत्सुक असा प्रेक्षकवर्ग आम्हाला लाभला आहे. त्यांच्या या आवडीचा विचार केल्याने इथे प्रत्येकासाठी काही ना काही आहे.”
या पत्रकार परिषदेत जिओ मामीच्या फेस्टिव्हल डायरेक्टर अनुपमा चोप्रा म्हणाल्या, “महोत्सवातील प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून आम्ही सिनेकर्मी ते प्रेक्षक अशा प्रत्येक संबंधितावर दूरगामी छाप सोडू इच्छितो. सिनेमा आणि सिनेकर्मींप्रती असलेली आमची बांधिलकी या महोत्सवातील प्रत्येक बाबीचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच, जगभरातील प्रतिभा इथे एकवटली जाईल आणि त्याचवेळी दक्षिण आशियाई सिनेमे आणि सिनेकर्मींना प्रकाशझोतात येता येईल, त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, अशी आम्हाला आशा आहे.”
जीओ मामीच्या सहसंचालक मैत्रेयी दासगुप्ता म्हणाल्या, “सहनिर्मिती आणि व्यावसायिक संधींना प्रोत्साहन देणाऱ्या या परिसंस्थेचा भाग होण्याची संधी प्रस्थापित आणि उदयोन्मुख सिनेकर्मींना या महोत्सवातून मिळते. अशा या महत्त्वाच्या १० दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यातील विविध उपक्रम आणि स्पर्धांच्या माध्यमातून या महोत्सवाला आम्ही एक अनोखे व्यासपीठ बनवू इच्छितो. जिथे सिनेकर्मी आणि प्रेक्षकांना सक्षमतेची जाणीव मिळेल, त्यांची मते मांडता येतील आणि सिनेमा, त्याचा परिणाम, नव्या कल्पनांचा आनंद लुटता येईल.”
प्रस्थापित आणि उदयोन्मुख सिनेकर्मींच्या उत्कृष्ट सिनेमांची मेजवानी देणाऱ्या या महोत्सवाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या महोत्सवातील खालील विभागांची घोषणा करण्यात आली आहे (स्पर्धा आणि बिगर-स्पर्धा):
साऊथ एशिया स्पर्धा: या स्पर्धात्मक विभागात विविध भाषांमधील १४ समकालीन आणि महत्त्वपूर्ण असे १४ सिनेमे असतील.
वैशिष्ट्ये: सुमंत भट यांचा मिथ्या, लीझा गाझी यांचा बरिर नाम शहाना (अ हाऊस नेम्ड शहाना), फिडेल देवकोटा यांचा द रेड सुटकेस
फोकस साऊथ एशिया (बिगर-स्पर्धा): जगभरात पसरलेल्या दक्षिण आशियाई सिनेकर्मींच्या या सिनेमांतून या भागातील विविधतेचे दर्शन घडेल. चित्रपटांचा कालावधी, भाषा, कथामांडणीचा बाज आणि प्रकार असं प्रचंड वैविध्य असणाऱ्या या विभागातील सिनेमांमध्ये दक्षिण आशिया आणि या भागातून जगभरात पसरलेल्या सिनेकर्मींच्या प्रतिभेवर भर देण्यात आला आहे. दक्षिण आशियाई सिनेमांचा अनुभव अधिक समृद्ध करणारे कथाकथन हा याचा गाभा आहे. यात विविध कालावधीचे ४६ सिनेमे आहेत.
वैशिष्ट्ये: वरुण ग्रोवर यांचा ऑल इंडिया रँक, विनोद रावत यांचा पुश्तैनी, करण तेजपाल यांचा स्टोलन, मिलिन धमाडे यांचा माई
आयकॉन्स साऊथ एशिया: दक्षिण आशियातील प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या अश सिनेकर्मींचे सिनेमे या विभागात आहेत.
वैशिष्ट्ये: आनंद पटवर्धन यांचा वसुधैव कुटुंबकम्, विक्रमादित्य मोटवाने यांचा इंडि(रा)याज इमर्जन्सी, मुस्तोफा सरवार फारुकी यांचा समथिंग लाइक अॅन ऑटोबायोग्राफी
गाला प्रीमिअर साऊथ एशिया: या विभागात भारतातील यंदाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी सिनेमांचा समावेश आहे. देशभरातील प्रस्थापित प्रतिभावान सिनेकर्मी आणि अनोख्या पद्धतीने दिग्दर्शनातून आपले म्हणणे मांडणाऱ्या सिनेकर्मींचा प्रतिभा यातून दिसून येईल.
वैशिष्ट्ये: अनुराग कश्यप यांचा केनेडी, ताहिरा कश्यप यांचा शर्माजी की बेटी, रजत कपूर यांचा एव्हरीबडी लव्हस सोहराब हांडा
मराठी टॉकीज: २०१६ मध्ये सुरू झालेल्या या विभागात समकालीन मराठी सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश असतो. आपल्या मूळ मातीतील म्हणजेच महाराष्ट्रातील समकालीन विचार मांडणाऱ्या सिनेमांचा वाढता विभाग जिओ मामीच्या मराठी टॉकीज या व्यासपीठावर सादर केला जातो. यंदा सचिन चाटे यांनी या विभागातील सिनेमांची निवड केली आहे.
वैशिष्ट्ये: आशिष बेंडे यांचा आत्मपॅम्फ्लेट (Auto-bio Pamphlet), रितेश देशमुख यांचा वेड, क्षितिज जोशी यांचा ढेकूण, परेश मोकाशी यांचा वाळवी
डायमेन्शन्स मुंबई: जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये २००९ साली श्रीमती जया बच्चन यांच्या हस्ते पहिल्यांदा डायमेन्शन्स मुंबई हा विभाग सादर करण्यात आला. सध्या हा विभाग या महोत्सवातील एक सर्वाधिक लोकप्रिय विभाग आहे. डायमेन्शन्स मुंबईतील अनेक विजेते सिनेकर्मी थेट सिनेमे आणि वेब सीरिजपर्यंत पोहोचले आहेत.
वैशिष्ट्ये: विदार जोशी यांचा शुड आय किल मायसेल्फ ऑर हॅव अ कप ऑफ कॉफी? कुमार छेडा यांचा हाफवे, अंजनी चढ्ढा, निवेदिता राणी यांचा सिटी ऑफ मिराज
वर्ल्ड सिनेमा: या लोकप्रिय आणि अनोख्या विभागात फेस्टिव्हलच्या वर्षात जगभरात तयार झालेल्या आणि समीक्षकांनी नावाजलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश असतो.
वैशिष्ट्ये: जस्टिन ट्रिएट यांचा अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, फेड्रो कोस्टा यांचा द डॉटर्स ऑफ फायर, हिरोकाझु कोरे-एडा यांचा मॉन्स्टर, हाँग सँग-सू यांचा इन अवर डे, पेड्रो अल्मोडोवर यांचा स्ट्रेंज वे ऑफ लाईफ, केन लोच यांचा द ओल्ड ओक, अकी कौरीस्माकी यांचा फॉलन लीव्ह्स, एलिस रोहरवॉचर यांचा ल शिमेरा, बर्ट्रांड बोनेलो यांचा द बीस्ट, ब्रॅडली कुपर यांचा मॅस्ट्रो
आफ्टर डार्क: बिफानचे जोंगसुक थॉमस नाम यांनी यातील सिनेमांची निवड केली आहे. या विभागात जगभरातील सर्वाधिक थ्रिलिंग सिनेमांचा समावेश असतो.
वैशिष्ट्ये: पार्क चॅन-वूक यांचा ओल्डबॉय Oldboy (रिस्टोअर्ड), कॅमरॉन कैर्नेस यांचा लेट नाईट विथ द डेविल, ख्रिस्तोफर बोरगिल यांचा ड्रीम सिनारिओ, विराट पाल यांचा नाईट ऑफ द ब्राइड
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स: शॉर्ट फिल्म प्रकारची वाढती लोकप्रियता आणि त्यांचे महत्त्व रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्समध्ये मांडले जाते. मूळ शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांसमोर आणून या उदयोन्मुख सिनेकर्मींना त्यांची कलाकृती मोठ्या पडद्यावर आणण्याची संधी यातून मिळते. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्समधील द परफेक्ट टेन या स्पर्धेत भारतीय सिनेकर्मींनी बनवलेल्या १० मिनिटांहून कमी कालावधीच्या चित्रपटांचा समावेश असतो.
वैशिष्ट्ये: दिबांकर बॅनर्जी यांचा बॅडमिंटन, रिशव कपूर यांचा नेक्स्ट, प्लीज, श्रीरंग पाठक यांचा थेंब
रिस्टोअर्ड क्लासिक्स: आपला चित्रमय वारसा जपणे, त्याचा सन्मान करणे ही या महोत्सवाची बांधिलकी आहे. भारत आणि जगभरातील विविध डिजिटली नव्याने जपले गेलेले क्लासिक सिनेमे या विभागात दाखवले जातात.
वैशिष्ट्ये: योनफॅन यांचा बुगीज स्ट्रीट, क्लेअर डेनिस यांचा चॉकलेट, होऊ शाओ-शेन यांचा मिलेनिअम माम्बो
मामी ट्रिब्युट: सिनेमाची कला अधिक विकसित व्हावी यासाठी आपल्या प्रतिभेसह सिनेमांमध्ये प्रचंड सहभाग दिलेल्या व्यक्तींना या विभागातून आदरांजली वाहिली जाते.
रेट्रोस्पेक्टिव्ह: रेट्रोस्पेक्टिव्ह विभागाच्या माध्यमातून जिओ मामी महोत्सव सिनेसृष्टीतील महान व्यक्तींच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेते. या विभागातून आंतरराष्ट्रीय सिनेमांचा इतिहास पुन्हा मोठ्या पडद्यावर जागवला जातो.
रिकॅप : या विभागात २०२० ते २०२२ या काळातील आमच्या निवडक सिनेमांचा पुन्हा आस्वाद घेता येईल.
वैशिष्ट्ये : अपर्णा सेन यांचा द रेपिस्ट, प्रसुन चॅटर्जी यांचा दोस्तोजी, पायल कपाडिया यांचा अ नाइट ऑफ नोइंग नथिंग
जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल भारतात मुंबईमध्ये शुक्रवार २७ ऑक्टोबर ते रविवार ५ नोव्हेंबर २०२३ या काळात रंगणार आहे.
#जिओमामी #jiomami #jiomamifilmfestival #2023 #mami #mami2023 #nmacc
No comments:
Post a Comment