आता कोणीच स्टार नाहीत - नाना पाटेकर
- हर्षदा वेदपाठक
बिनधास्त बोलणे यासाठी नाना पाटेकर प्रसिद्ध आहेत. एक टुकार चित्रपट पाचशे कोटी कसे कमावू शकतो, कोरोना ने सगळ्यांना कसे बेहाल केले, जगायला मोजके पैसे लागतात मग अधिक काम का करायचे, भाषा, रंगभूमी, भारतीय शास्त्रज्ञ या सगळ्यांवर नाना सडेतोड उत्तर देतात.
क्वारंटाईनच्या काळात तुम्ही तुमचा वेळ कश्याप्रकारे घालवत होतात ?
मी संपूर्ण काळ माझ्या शेतातच रहात होतो . माझ्याकडे १४ एकर शेतजमीन आहे आणि त्याभोवती फिरायला मला सुमारे दोन तास लागतात. माझ्याकडे पाच कुत्रे, दोन गायी आणि दोन म्हशी आहेत. स्थानिक जातीचे ते कुत्रे इतके हिंस्त्र आहेत की, माझ्या परवानगीशिवाय शेतावर कोणीही येत नाही. त्यामुळे मी नेहमीच (हसून) क्वारंटाईनमध्ये होतो. महामारीच्या काळात माझ्या आयुष्यात काहीच बदलले नाही. मी शेतावर रहात असल्यामुळे बाहेरचे लोक मला भेटायला येऊ शकत नव्हते. नाम फाऊंडेशनच्या कामासाठी मी बिहारला जात होतो. जेंव्हा सुशांत सिंगने आत्महत्या केली, तेंव्हा मी त्याच्या वडीलांना जाऊन भेटलो. नंतर मी कोलकत्याला गेलो. मला सात ते आठ वेळा करोना झाला, मला एक दिवसासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले, पण काही झाले नाही. मी फारशी काळजी केली नाही. कोरोना हा माझ्यासाठी, आगंतुक पाहुण्यासारखा होता आणि मी त्याला काही फारशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे तो आला तसा तो निघून गेला.
माझ्या मुलाने मला लसीकरण करुन घेण्यासाठी आग्रह केला. मला माझी प्रतिकारशक्ती तपासून पहायची होती, त्यामुळे मला लसीकरण करायचे नव्हते, पण माझ्या मुलाने काळजीपोटी खूप आग्रह धरला. कारण कितीतरी रुग्णांचे अंत्यसंस्कारही त्यांच्या कुटुंबियांपासून दूर करावे लागले होते.
तुमच्या प्रवासाकडे तुम्ही कसे पहाता, आता कॅमेऱ्यासमोर काम करत नसताना चुकल्यासारखे वाटते का?
हा प्रवास अतिशय समाधानकारक राहीला. मी काहीही गमावले नाही, माझ्या आयुष्यात दुःखाला जागा नाही. मला कशालाच मुकल्यासारखे वाटत नाही, ना कॅमेरा, ना काम...मी माझ्या गावातील शेतात आनंदी आहे. माझ्याकडे आता करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत आणि तिथे मी जास्त चांगले आयुष्य जगत आहे. मी माझ्या नाम फाऊंडेशनमध्ये व्यस्त आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नाही, तर काश्मीर, गुवाहाटी आणि आता जयपूरमध्येही मी काम हाती घेतले आहे. आम्ही ते देशभर पसरवले आहे. मला एखादी पटकथा आवडली तर मी करतो, पण मला खूपच कमी ऑफर्स येतात. मी माझ्या स्वतःच्या अटींवर काम करतो, पहिली म्हणजे पटकथा उत्तम असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्यांनी मला घसघशीत मोबदला द्यायला हवा. मला चांगल्या झोपेची गरज असल्यामुळे मी आठ तासांच्या वर काम करणार नाही. मला चित्रिकरण सुरु होण्यापूर्वी त्यांनी बांधीव पटकथा दिली पाहिजे. बांधीव पटकथा नसल्यास मी काम करु शकणार नाही. असे चित्रपट करायला मी नकार देतो. काही लोक सेटवर पटकथा बदलतात, मला असे काम करायचे नाही. जर त्यांनी माझ्या अटी स्विकारल्या नाहीत, तर मी ते काम घेत नाही.
आता चित्रपट स्विकारण्यासाठी तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?
मी दिग्दर्शकांना विचारतो की ते ही भूमिका घेऊन माझ्याकडे का आले आहेत. जर त्यांनी मला हे पटवून दिले, तर मी ते काम घेतो. द वॅक्सिन वॉर हा माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर दिग्दर्शकाने मला सांगितले की, चित्रपटात एक संवाद आहे ज्यात म्हटले आहे, “भारत हे करु शकतो,” आणि जर तुम्ही ते आवेशाने म्हटलेत, तर लोक ते मान्य करतील. आणि फक्त तुम्हीच ते करु शकाल. तुम्ही जनतेला हे पटवून देऊ शकता. त्यामुळे मी तो चित्रपट स्विकारला.
असे लोक आहेत जे भारत हे करु शकत नाही असे म्हणू शकतात?
हो...असं म्हणतील असे बरेच लोक आहेत. ते परदेशातून निधी घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या देशाविरुद्ध बोलतात. त्यानंतर ते म्हणतील की यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आता ते भारत या शब्दाविरुद्ध तक्रार करत आहेत. भारत हा शब्द प्रयोग नेहमीच येथे आहे. बाहेरचे लोक इंडीया म्हणतात, मग त्याच्याविरोधात वाद कशाला? मुंबईला पूर्वी नेहमीच बॉम्बे म्हटले जायचे कारण त्यांना ते नीट उच्चारता येत नसे.
तुमच्यासाठी मुंबई किती बदलली आहे?
ही ती मुंबई नाही, जी बघत मी मोठा झालो. ती आता बदलली आहे. आजूबाजूला जंगल होते, लोकांमध्ये खूप प्रेम आणि आपुलकी होती. आपसात घरी शिवजलेले जेवण वाटून घेतले जायचे. आता लोक धर्म,जात आणि कितीतरी क्षुल्लक मुद्द्यांवर एकमेकांशी भांडताना दिसतात.
तुम्ही सेल्फ मेड आहात. आयुष्यभर खूप मेहनत घेतली आहे तुम्ही. आता अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी तुम्ही झटत नाही?
मी सध्या जगत असलेल्या आयुष्याबाबत मी समाधानी आहे. मला इतक्या जास्त कमाईची इच्छा नाही. आपण दिवस रात्र काम करणारे प्राणी आहोत. अगदी त्यांनाही विश्रांतीची गरज असते. मोठ्या घराचे मी काय करणार आहे? मला जेवढी गरज आहे, तेवढे माझ्याकडे आहे. जेंव्हा मी मरेन तेंव्हा हे सगळे बरोबर नेणार नाही. माझे पैसै काही निर्मात्यांकडे आहेत, ज्या दिवशी त्यांना चित्रपट बनवायचा असतो, तेव्हा ते मला पैसे देतात, त्याने सुखात आयुष्य सुरू आहे.
तुमच्या अभिनयाला अनेक लोकं पसंद करतात. तुमच्या अभिनयाची पद्धत काय आहे?
प्रत्येक कलाकारची, अभिनयाची स्वतःची एक पद्धत असते. कलाकारनुरुप त्यांची अभिनय पद्धती असते. असंही होऊ शकते की, खेडेगावातील एक तरुण ज्याला चांगला अनुभव आहे, एक चांगला अभिनेता होऊ शकतो. तो त्याची वाक्ये लक्षात ठेवू शकतो. त्याचे सुख-दुःखाचे अनुभव त्याला अधिक चांगला अभिनेता बनवू शकतात. प्रत्येकाचा जीवनाचा अनुभव वेगळा असतो. गरीबाचा अनुभव वेगळा असतो, तर श्रीमंताचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. माझे म्हणाल तर मी पाहिली डिटेल पटकथा मागतो, ती अनेकदा वाचतो. त्यातील सगळे बारकावे मनात, मेंदूत साठवतो. आणि त्या बरोबर समरस झाल्यावर, दृश्य देताना मला सोपे जाते. मी कधीच ग्लिसरीन वापरत नाही, नैसर्गिकरीत्या भावनिक दृश्य देतो.
द वॅक्सिन वॉर हा तुमचा ऐशीवा चित्रपट आहे. तुम्ही तुमचे जुने चित्रपट पहाता का?
द वॅक्सिन वॉर हा माझा ऐशीवा चित्रपट आहे का ते मला माहीत नाही. माझे चित्रपट मी कधीच पहात नाही. कारण एकदा चित्रपट पूर्ण केला की माझ्यासाठी नविन सुरुवात गरजेची असते. त्यामुळे मला त्यापासून लांब जाणे गरजेचे असते. नवी सुरुवात करण्यासाठी तुम्हाला ते, जुने जाऊ द्यावे लागते.
द वॅक्सिन वॉर हा चित्रपट का स्विकारला?
हा चित्रपट आपण शोधलेल्या लसीबद्दल आहे. डॉ. भगवान भार्गव यांच्या अनुभवावर तो आधारीत आहे. मी त्यांना भेटलो नाही कारण मला एक नवा अनुभव हवा होता आणि मला त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी फारसा वेळ नव्हता. ते कसे चालतात, काम करतात आणि बोलतात, ते मी पाहिले नाही. त्यांना मी चित्रपट पूर्ण झाल्यावरच भेटलो. मी एक अभिनेता म्हणून दिग्दर्शकाच्या दृष्टीला शरण जातो. डॉक्टर ही भूमिका पाहून खूष होते, ते प्रत्यक्षात जसे आहेत त्याच्याशी खूप साधर्म्य सांगणारी ही भूमिका होती. ही भूमिका साकारायला सोपी होती. अभिनय हा क्रिकेटसारखा आहे. तुम्ही खेळता कारण तुम्हाला खेळण्यात आनंद मिळतो, यासाठी नाही की तुम्हाला जिंकायचे असते. काही वेळा असे काम होते, काही वेळा होत नाही. जेंव्हा मी मराठी रंगभूमीवर काम केले, तेंव्हा आम्ही त्याला आमची कसोटी म्हणायचो. आम्ही कधीही त्याला शो म्हटले नाही. आम्ही त्याला कसोटी म्हणतो, कारण आम्ही अभिनय करत असतो. आम्हाला दररोज स्वतःला सिद्ध करावे लागते. चित्रपटामध्ये आम्हाला दर आठवड्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आता कोणीही स्टार्स नाहीत, आमच्या काळात देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर हे स्टार्स होते.
शास्त्रज्ञांना पुरेसा आदर दिला जात नाही, असं तुम्हाला वाटतं का?
माणूस म्हणून आपण लोकांचे आभार मानायला विसरतो. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने इतका सुंदर चित्रपट बनवला आहे. आदराचे प्रतीक म्हणून अशा प्रकारचे चित्रपट तयार करायला पाहिजेत. आपले शास्त्रज्ञ असाधरण आहेत आणि त्यांनी अनेक, किंमती औषधे बनवली आहेत, ज्यामुळे मानवजातीला फायदा झाला. आपण अनेक गरीब देशांना मदत केली. डब्ल्युएचओनी सुद्धा आपल्याला अमूल्य अशी लस बनवण्याचे श्रेय दिले आहे.
आजकाल बरेच जण हिंदी चित्रपट तयार करताना इंग्रजी भाषेत पटकथा लिहितात. तुम्ही भाषेला किती महत्व देता?
हो, मी अशा पटकथा स्वीकारत नाही. मी देवनागरी भाषेतील पटकथेसाठी आग्रही असतो. मी इंग्रजी भाषेत संवाद साधू शकतो, पण मी इंग्रजी वाचत नाही. एक अशी अभिनेत्री होती, जी इंग्रजीत लिहायची आणि तिचे उच्चार चुकीचे असायचे. आपण एकमेव असा देश आहोत, जिथे आपल्याकडे विविध संस्कृती आणि भाषा आहेत. हिंदी सुद्धा आपली एक भाषा आहे. माझ्या मते माणूस जिथे कुठे जातो, तेथील भाषा त्याने शिकलीच पाहीजे. मला लोकांमध्ये त्यांच्या भाषेवरुन फूट पाडणारा मुद्दा आवडत नाही. जेंव्हा मी कर्नाटकमध्ये जतो, तेंव्हा मी त्यांच्याशी मला जी काही कन्नड येते, त्यात संवाद साधतो. मी थोडीशी तुलु आणि पंजाबीही बोलतो. मी जिथे कुठे जातो, तिथे स्थानिक भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. तेथील लोकांना ते फार आवडते. सुरुवातीला जेंव्हा मी हिंदी शिकलो तेंव्हा बोलताना मी चाचरत असे. पण आता अनेक भाषा येतात मला.
तुम्ही मराठी रंगभूमी पूर्णपणे सोडून दिली आहे का?
पुर्वी नाटक करताना, आम्ही दिवस रात्र काम करायचो. पण यापुढे मी असे काम करु शकत नाही. रंगमंच संदर्भात मी रोज लोकांशी बोलतो. आणि आता मी ७३ वर्षांचा आहे. पूर्वी आम्ही सकाळी ९ वाजता तालीम सुरु करायचो आणि ६ वाजता संपवायचो. ती रात्रभर लांबायची आणि हे असेच चाळीस दिवस चालायचे. आता ते वयोमानाप्रमाणे होवू शकत नाही
अभिनयक्षेत्रात तुम्हाला मित्र आहेत का?
हो, ऋषी कपूर, डॅनी, अनिल कपूर आणि मिथुन. ऋषी खुपच चांगला माणूस होता. तो घरी यायचा. एकदा तो त्याचे ड्रींक घेऊन आला होता आणि मी खीमा पाव बनवला होता. अनेकांना माहीत नाही, पण मी उत्तम जेवण बनवतो. पन्नास लोकांचे जेवण सहज करू शकतो. नीतू सिंग आली नव्हती, म्हणून मी त्याला आत येऊ नकोस असे सांगितले. तिला फोन केला आणि सांगितले की मी तिच्या घरी कधीच पाऊल ठेवणार नाही. ते ऐकल्यावर ती लगेच आली आणि त्यांनी खीमा पाव खाल्ला. सुरवातीला नको नको करत होता. त्याला खाण्याचे फार आवडायचे. त्याने खूप खाल्ले. अतिशय छान, जिंदादील माणूस होता. ज्याला मी खूप कमी भेटलो, पण तो खूप चांगला मित्र होता. मला आता त्याची आठवण येते.
तुम्ही निर्माता हि आहात. चित्रपटाची निर्मिती कधी करणार आहात?
मी हिंदीत चित्रपट तयार करणार आहे. आणि तो ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. चांगले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. माझ्याकडे एक अप्रतिम पटकथा आहे. बघूया ते कधी प्रत्यक्षात येते ते!!!
सगळीकडे, आत्मचरित्र लिहायची लाट दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यावर पुस्तक लिहीताना दिसणार आहात काय?
नाही, मला काहीही लिहायचे नाही. ज्या दिवशी मी मरेन त्यावेळी मी कोणालाही आठवणार नाही. जिवंतपणी मला खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे. तुम्ही निघून गेल्यावर कोणालाच तुमची पर्वा नसते.
तुमच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगा ना..
माझ्याकडे खूप चांगल्या भमिकांसाठी विचारणा होत आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपट मी केला आहे. त्याचे नाव आहे, द कन्फेशन. अनंत महादेवन दिग्दर्शित हा चित्रपट सोशल थ्रिलर आहे. वास्तवदर्शी कथानक आहे ते. यावर्षी माझे ओटीटी पदार्पण होणार आहे. प्रकाश झा यांची ऐक मालिका आहे, लाल बत्ती. त्यात ऐका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहे मी. ती मालिका राजकीय थ्रिलर आहे.
- हर्षदा वेदपाठक
No comments:
Post a Comment