२० ऑगस्ट मराठी रजतपटावरील ज्येष्ठ कलाकार गणपत पाटील यांचा जन्मदिन.
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत.तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.."झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील.
त्यांच्या ‘आत्ता ग़ बया‘ ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती,
गणपत पाटलांचा जन्म २० ऑगस्ट १९२० कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.
त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची – म्हणजेच ’नाच्या’ची – आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.
बायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची. प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात. अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार,चंद्रकांत… सांगत्ये ऐका हा त्यातला सुवर्ण पट म्हणावा लागेल. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक – उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील !
गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. बालध्रुवमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. १९४९ मधल्या ‘मीठभाकर‘ने त्यांना ओळख दिली. ‘राम राम पाव्हणं‘ ने शिक्का मारला तर १९५१ च्या ‘पाटलाचा पोर‘ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या ‘छत्रपती शिवाजी‘मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. १९६० शिकलेली बायको’ने त्यांचे बस्तान पक्के केले. १९६३ मधील ‘थोरातांची कमळा‘ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्या नंतर आलेल्या १९६४ मधल्या ‘पाठलाग‘, ‘सवाल माझा ऐका‘, ‘वाघ्या मुरळी‘ या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसनसात भिनला. १९६५ मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता‘ने त्यांना स्टार कलाकारांईतके महत्व आले. १९६५ च्या ‘मल्हारी मार्तंड‘ आणि ‘रायगडचा राजबंदी‘ने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. १९६७ -‘बाई मी भोळी‘ आणि ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी‘ आणि ‘सांगू मी कशी‘ ‘सुरंगा म्हनत्यात मला‘, ‘छंद प्रीतिचा‘,’धन्य ते संताजी धनाजी‘ पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र १९६८च्या ‘एक गाव बारा भानगडी‘ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. १९६९ मधील ‘खंडोबाची आण‘ व ‘गणगौळण‘ मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण १९७०च्या ‘अशी रंगली रात‘ आणि ‘गणानं घुंगरू हरवलं‘ या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले. १९७१ च्या ‘अशीच एक रात्र‘ आणि ‘लाखात अशी देखणी‘ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र १९७१ मध्ये दादांच्या ‘सोंगाड्या‘ने त्यांना नाव दिले अन समाजाने त्यांचे नाव घालवले. यानंतर आलेल्या अनेक सिनेमात १९७२ – ‘पुढारी‘ १९७४ – ‘सून माझी सावित्री‘, ‘सुगंधी कट्टा‘ १९७६- ‘जवळ ये लाजू नको‘ १९७८ – ‘कलावंतीण‘, ‘नेताजी पालकर‘ १९७९ – ‘ग्यानबाची मेख‘, ‘हळदी कुंकू‘ १९८० – ‘मंत्र्याची सून‘, ‘सवत‘ १९८१- ‘पोरी जरा जपून‘ १९८१ – ‘तमासगीर‘ १९८२ – ‘दोन बायका फजिती ऐका‘, ‘राखणदार‘ १९८७ – ‘बोला दाजिबा‘, ‘इरसाल कार्टी‘ १९९०- ‘थांब थांब जाऊ नको लांब‘ १९९३ – ‘लावण्यवती‘ २००६ – ‘मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे‘ हे चित्रपट मुख्य गाजले.
गणपत पाटील जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव पर्यंत कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाच्याचे काम गणपत पाटलांना दया असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले अन इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पना करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले मात्र अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे‘ मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा ‘विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार‘ त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी २००५ चा ‘झी जीवनगौरव पुरस्कार‘ हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा.
२३ मार्च २००८ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. मला कधी कधी वाटते की त्या विश्वनिहंत्याने देखील त्यांना एकदा टाळी वाजवून ‘आत्ता गं बया !’ म्हणायला लावले असेल अन तोही मनमुराद हसला असेल. पण यांच्या डोळयातले अश्रू त्यालाही कळले नसतील… आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली.
अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. ‘नटरंग‘ आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. मार्च २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती.
आपली कदाचित ही शेवटची पिढी असावी ज्यांना गणपत पाटील माहित होते. मराठी सिनेमा म्हटला की अजूनही डोळ्यासमोर पूर्वेचे रांगडे, ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपट आठवतात.अरुण सरनाईक, जयश्री गडकर, सूर्यकांत, चंद्रकांत, गणपत पाटील, रविंद्र महाजनी अशीच नावे लक्षात येतात. आजचे नवे चित्रपट पाहतांना नवीन पिढीला या गुणी कलावंतांची कितपत ओळख राहील? या बद्दल शंकाच आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गणपत पाटील ह्या उपेक्षित शिलेदाराला भावपूर्ण श्रध्दांजली!
(Not my artical. Copied)
No comments:
Post a Comment