जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच सुरु होणार - विनोद तावडे
प्रायोगिक रंगभूमी होणे ही महाऱाष्ट्राची सांस्कृतिक आवश्यकता आहे, गेली सुमारे १० वर्षे लालफितीमध्ये रखडलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाच्या कामाचा आज शुभारंभ आज झाला असून सर्व नियम व कायद्याचे पालन करुनच येत्या सहा महिन्यात रंगमंचाचे काम पूर्ण होईल आणि येत्या जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगमंच सुरु होईल. राज्य शासन प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, महाराष्ट्रातील नाट्यचळवळ अधिक जोमाने पुढे नेता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज ठामपणे सांगितले.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावरील जागेत प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुणकाका काकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील नामंवत मंडळी उपस्थित होती.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांनी सांगितले की, एखादा प्रकल्प लालफीतीमध्ये अडकतो म्हणजे काय याचे हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. २००९ पासून ही जागा अशीच पडून होती. याजागेत प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाची निर्मितीमध्ये अनेक अडथळे येत होते. परंतु गेल्या सुमारे दीड–दोन वर्षात हा प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट्य आखण्यात आले. या फाईल वर असलेले अनेक प्रशासकीय तांत्रिक अडथळे दूर करीत व नियम व कायद्याचे पालन करुन प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला. गेली सुमारे १० वर्षे लालफितीत अडकलेला हा प्रकल्प मंजूर करताना अतिशय पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत या रंगमंचाबाबत माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य मिळावे, चांगले कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, येथील आसनव्यवस्था रंगमंचाला पूरक अशी करण्यात येणार आहे.
वर्षभरात प्रायोगिक नाट्यसाठी २०० प्रयोग ठेवण्यात येतील. अतिशय नाममात्र दरामध्ये नाट्यसंस्थेला प्रायोगिक रंगभूमी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामध्ये रंगकर्मींना सर्व पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येतील. व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना प्रायोगिक रंगभूमी हा नाटकाचा पाया असतो. त्यामुळे या माध्यमातून प्रायोगिक नाट्यभूमीचा पाया भक्कम होईल. तसेच आजच्या युवा कलाकारांना या नवीन व्यासपीठाच्या मार्फत आपली कला सादर करण्याची अधिक चांगली संधी मिळेल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
राज्य शासन व महापालिकांमार्फत नाट्यगृहांची उभारणी करण्यात येते. त्यानंतर या नाट्यगृहांमध्ये चालणा-या नाट्यप्रयोगाच्या भाड्यामधून नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल, अशी सर्वसाधारण व्यवस्था आहे, पण नाट्यगृहच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य शासन व पालिका यांच्या व्यवस्थेतून पुरेशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन व पालिकांच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.
प्रायोगिक रंगभूचीच्या प्रस्तावित रंगमच असा असेल...
१. ३९१ दर्जेदार आसने
२. डिजीटल सिनेमा प्रोजेक्टर
३. आधुनिक तंत्रज्ञानाची युक्त प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था
४. दर्जेदार ध्वनी शोषक (अकौस्टिक्स) प्रणाली
५. सुसज्ज मेकअप रुम
६. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष
७. सेंटरलाईज्ड वातानुकुलन
८. भव्य स्टेज
९. भव्य स्क्रिन व आधुनिक स्टेज ड्रेपरी
१०.पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय
११. २ उद्वाहने
१२. अग्नीशमन यंत्रणा.
No comments:
Post a Comment