Friday, 12 May 2017

INTERVIEW - RAM GOPAL VARMA


माझी कातडी गेंड्याची आहे - राम गोपाल वर्मा
-    हर्षदा वेदपाठक
गॅंगपट आणि हॉररपटानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा,  सरकार या चित्रपटाचा भाग तिन घेऊन येत आहे त्याबद्दल त्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा...
सरकार आणि सरकार दोन या मालिकेतील तिसरा चित्रपट दिग्दर्शित करणे किती आव्हामात्मक होते? जेव्हा पहिल्या चित्रपटाने प्रेक्षकांवर पाडलेली छाप अजूनही कायम आहे ?  
ज्यांनी सरकार किंवा सरकार राज पाहिला आहे, त्यापैकी किती गोष्टी किती जणांच्या लक्षात आहेत ?   या दोन्ही चित्रपटामधील किती गोष्टींबरोबर प्रेक्षक संबंध जोडून पाहू शकतात ? यावर विचार केल्यावर मी सरकार तिन तैय्यार केला. ज्यांनी ते दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत, त्यांना ते पहावेसे वाटतील. प्रेक्षकाला किती कळले,  या चित्रपटात किती चांगल्या गोष्ट आहेत यावर माझ्या आगामी चित्रपटाचे यश अवलंबुन आहे. माझा हा विश्वास कदाचित एक मोठी चूक देखिल ठरु शकते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला खरे काय ते समजेल. माझ्या प्रत्येक चित्रपटात गॅप आहे. ती गॉडफादर आणि गॉडफादर मध्येदेखिल होती. आणि तो खंड तब्बल वीस वर्षांचा होता. तरी प्रेक्षकांनी ते चित्रपट पसंद केलेच ना...
सरकार मालिकेबद्दल काय सांगाल ?
ज्यांना सरकार आवडला होता, त्यांना नक्कीच पुढचा भाग पहाण्याची इच्छा असणार. दहापैकी किमान पाच जण तरी हा चित्रपट पहातील असे मला वाटते.
यातून आम्हाला नविन रामगोपाल वर्मा पहायला मिळणार का ?
हो, जुना रामगोपाल वर्मा आता जिवंत नाही, त्यावेळची विचारधाराच वेगळी होती. आता तुम्हाला नविन आरजीव्ही पहायला मिळेल. मला आशा आहे की माझ्यातील हा बदल चांगल्यासाठीच असेल.
आरजीव्हीच्या चित्रपटाच्या प्रेक्षकवर्गाबद्दल काय सांगाल?  आरजीव्हीचा खास मोठा प्रेक्षकवर्ग आहे काय ?
शिवा हा माझा सिनेमा हिट होता, द्रोही पडला. रातही फ्लॉप झाला. रंगीला हिट ठरला तर दौड जोरात आपटला. पुन्हा सत्या हिट तर मस्त फ्लॉप झाला. त्या काळी माध्यमांचा प्रभाव खूप मोठा नव्हता. आणि माझी कारकिर्दही यशस्वी आणि अयशस्वी चित्रपटांचे मिश्रणच होती. त्यामुळे प्रतिसाद फार मोठा असा काही नव्हता. आता माध्यमे आणि समाजमाध्यमांचे महत्व खूप वाढले आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानही महत्वाचे ठरु लागले आहे. माझ्या चित्रपटांनी फार मोठा व्यवसाय केला नाही हे मी कबुल करतो. २००३ मध्ये मी फॅक्टरी सुरु केली. तेव्हा मला वितरण व्यवस्थेची अजीबात कल्पना नव्हती. आणि त्यामुळे माझे काही चित्रपट आपटलेत. त्यानंतर मी दोन वर्ष मुंबईच्या बाहेर तेलगु चित्रपट करण्यात व्यस्त  होतो. माझ्या हातुन काही चुका घडल्या आहेत, त्या मी पुन्हा करणार नाही याची काळजी घेईन.
चित्रपटसृष्टीतील स्टार सिस्टीमबाबत काय सांगाल ?
मी कधीच स्टार्सबरोबर काम केले नाही. तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलत असाल तर ते नेहमीच मोठे कलाकार राहिलेत. मी अतिशय उत्कट आणि नाट्यमय चित्रपट केले आहेत. तसेच संवाद आणि रचानात्मकदृष्ट्यादेखील ते सशक्त चित्रपट होते. बच्चन यांना घेऊन २००४ मध्ये मी सरकार बनवला. काही फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही ते माझ्याबरोबर काम करत आहेत, ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.
अमिताभ बच्चन यांच्याविषयी आणखी काय सांगाल ?
लोक नेहमीच परिणामांकडे पहातात, तर त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. चित्रिकरणाला यायला उशीर होणार असल्याचा त्यांनी मला एकदा मेसेज केला. त्यावर मी त्यांना म्हटले,जहा आप खडे हो, वहा से लाईन शुरु होती है.ज्या क्षणी तुम्हा याल, त्याक्षणी चित्रिकरणास सुरुवात होईल. मी जेव्हा नागार्जुनाला भेटण्यासाठी नेपाळला गेलो होतो. तेथेच ते खुदा गवाह या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतेत. आणि तेथे मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर ते सत्या बघण्यासाठी आले होतेत. जेंव्हा मी अभिषेकबरोबर नाच हा चित्रपट करत होतो, तेंव्हाच मी त्यांना सरकारची कथा ऐकविण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. गेली अनेक दशके काम करुनही त्यांचा उत्साह कायम आहे आणि त्याचबरोबर कामाकडे पहाण्याचा त्यांचा नाविन्यपुर्ण दृष्टीकोणही... हे अविश्वसनीय आहे...
अजून काय शिकण्याची इच्छा आहे तुमची ?
सगळा वेळ मी केवळ शिकविण्यातच व्यस्त असल्यामुळे माझ्याकडे तरी काही शिकण्यासाठी वेळच नाही. समाजमाध्यमांवर मी गब्बर आहे. मला स्तुतीचे वावडे आहे. मला वाटते केवळ मेलेल्या लोकांचीच स्तुती केली जाते. तो बास्टर्ड होता असं कोणी म्हणणार नाही मला वाटते, त्यामुळे स्वातंत्र्य वाढते. जर मी वर्गात असेन आणि शिक्षकांनी सांगितले की मी हुशार आहे, तर त्या दबावाखाली मला आणखी मेहनत घ्यावी लागेल. जर त्या म्हणाल्या की माझे काहीच होऊ शकत नाही, तर मात्र मी बाहेर जाऊन खेळू शकतो. आपली शिक्षण व्यवस्था हा एक विनोदच आहे. मी अभियंता बनलो खरा पण मला त्यातील अनेक कम्पोनंन्ट माहित नाहीत.
टायगर श्रॉफ वरुन झालेल्या वादाबद्दल काय सांगाल ?
मी एक सशक्त माणूस आहे असं मी मानतो आणि म्हणून मी टीप्पणी करु शकतो. तर मला प्रामाणिकपणे कधीतरी वाटते की मी लोकांना त्रास देण्याचा जरा जास्तच प्रयत्न करत होतो की काय. त्यामुळे मला त्याचा कधी पश्चाताप देखिल वाटतो. आणि म्हणुनच मी टायगरची माफी मागितली. इथून पुढे मी कोणावरही व्यक्तिगत टीप्पणी करणार नाही असं ठरवलं आहे. बऱ्याच लोकांना मी दुखावत असल्याची मला स्वतःलाच जाणीव झाली आहे. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याची मी पर्वा करत नाही. तसेच मी त्या गोष्टी गांभिर्यानेही घेत नाही. माझी कातडी गेंड्याची आहे. पण मला वाटते लोक संवेदनशील असतात आणि मी त्यांना दुखावणे योग्य नाही.
अभिनेते अधिक संवेदनशील असतात का ?
माझ्या मते बहुतेक अभिनेते असतात. आजपर्यंत अमितजींनी मला माझ्या ट्विटस् बद्दल काहीही विचारलेले नाही. ते त्यांचे मत किंवा प्रतिक्रीया कधीच देत नाहीत. ते आगनंतरही माझ्याबरोबर का काम करत आहेत? असा मला प्रश्न पडतो.  ट्विट ही पाच सेकंदांची गोष्ट आहे. मी तुम्हाला दहा गोष्टी अशा सांगू शकतो, ज्यामुळे तुम्हाला राग येईल किंवा त्यावर तुमचा चित्रपट बनेल. जेंव्हा मी काम करत नसतो, तेंव्हा ट्विटच चित्रपट बनते.
तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळते ?
अनेक लोकांकडून मी प्रेरणा घेत असतो. त्यापैकी काही लोक ओळखीचे असतात तर काही लोक अनोळखी असतात.
चित्रपट या व्यवसायाबद्दल किंवा व्यवसाय म्हणून चित्रपटक्षेत्राबद्दस काय सांगाल ?
भारतामध्ये चित्रपट उद्योगाची वाढ नक्कीच चांगली झाली आहे. मात्र चित्रपट बनविण्यामागची मुलभूत प्रेरणा मात्र तिच आहे. जर रंगीलाने गल्ला कमावला तरीही चित्रपट म्हणून तो असाच राहीला असता ना. तंत्रज्ञानात कालापरत्वे बदल होत राहतील. मात्र त्याचा केवळ व्यवसायारपुरता विचार करणे चुकीचे ठरेल. आणि ती एक नैसर्गिक प्रक्रीया असेल.
मनोज बाजपेय असा ऐक कलाकार आहे जो तुमच्या अऩेक चित्रपटांचा हिस्सा राहीला आहे. सरकार तिन मध्ये देखिल तो आहे, काय सांगाल त्याबद्दल ?
आमच्यामध्ये वाद देखिल झालेत. एवढ्या वर्षात आम्ही मागचे सगळं विसरुन गेलो आहोत. त्यामुळे जेव्हा केव्हा माझ्याकडे भुमिका असेल तर  आम्ही भेटतो आणि एकत्र कामही करत आहोत.
तुम्ही कोणते चित्रपट पहाता?  अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट आवडला काय?
मी फक्त विदेशी चित्रपट पहातो. हल्लीच प्रदर्शित झालेला बाहुबली हा चित्रपट मला प्रचंड आवडला आहे.
सरकार हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारीत असल्याची चर्चा होती. त्यामुळे तो चित्रपट तुम्हाला बाळासाहेबांना दाखवावा लागला होता. अनेकदा सेन्सॉर बोर्डाच्या वरचढ एखादी व्यक्ती ठरु लागते या विचारप्रणालीवर काय सांगाल ?  
प्रदर्शनाआधी तिन दिवस बाळासाहेबांना चित्रपट दाखविण्याविषयी मी विचारले होते. आपल्या देशात लोकांना त्यांच्या कामाबाबत धास्ती असते. प्रत्येकाला अपील करण्याचा अधिकार आहे. कायदेशीर प्रक्रीयेद्वारे तुम्ही ते करु शकता. पण जर धमकावून तुम्ही तुमचे हक्क दाखविणार असाल, तर मात्र मी मुळीच पर्वा करत नाही.
लवस्टोरी करण्याचा काही विचार ?
प्रणयकथांपेक्षा आता मला सेक्स जास्त आवडतो. मिल्स ऍन्ड बून माझ्यासाठी नाही. आणि (हसुन) हे काही करण जोहरचे ऑफीस नाही लव्ह स्टोरी तयार करायला....
आणि भयपट करण्याचा काही विचार ?
एका भयपटाच्या कल्पनेवर मी सध्या काम करत आहे.
अभिषेक बच्चनविषयी काय सांगाल ?
तो एक अतिशय उत्तम कलाकार आहे, मात्र त्याला काहीसे कमी लेखले गेले आहे. मला तर तो एक उत्तम अभिनेता आहे असं वाटते. त्याला घेऊन मी अरेस्ट हा चित्रपट करत आहे. सध्यातरी त्यावर काम सुरु आहे. पुढच्या वर्षी चित्रीकरणास सुरवात करेन.

तुमचे मित्र कोण आहेत ?

मला आयुष्यात कधीच मित्र नव्हते. मी माझ्या मित्रांना देखिल शत्रूसारखे वागवतो.

तुमच्यासाठी मनोरंजनाचे काय साधन आहे ?

सध्यातरी ट्विटर हे माझ्यासाठी मनोरंजनाचे साधन आहे. यापूर्वी गॅंगस्टर्स होतेत.....








No comments:

Post a Comment