मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरु झालेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत सुमारे 3600 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. वर्षभरात मुंबईत नव्याने 10 तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा एकूण 30 बाईक ॲम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत. आज आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पालघर येथे बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
गेल्या वर्षी दोन ऑगस्ट ला मुंबईत 10 बाईक ॲम्ब्युलन्सचा शुभारंभ करण्यात आला. ही सेवा सुरु झाल्याच्या काही तासातच मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि अरुंद गल्ली, रस्ते येथून वैद्यकीय मदतीसाठी कॉल येऊ लागले. ज्या भागात चार चाकी रुग्णवाहिका पोहचण्यास अडचण निर्माण होते अशा ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. या बाईक ॲम्ब्युलन्सचे चालक डॉक्टर असल्याने आपत्तकालीन परिस्थितीत रुग्णांना प्रथमोपचार तातडीने मिळत आहे.
वर्षभराच्या कालावधीत विविध वैद्यकीय आपत्तकालीन परिस्थितीत 2700 रुग्णांना उपचार देण्यात आले. तर अपघाताच्या 390 रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत देण्यात आली. 42 गरोदर मातांना या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून तत्काळ उपचार करण्यात आले असून अन्य 442 रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने वर्षभरात सुमारे 3600 रुग्णांना जीवनदान या सेवेमुळे मिळू शकले.
प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे 10 बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्याची आवश्यकता लक्षात घेता दोन महिन्यापूर्वी नव्याने आठ ॲम्ब्युलन्स मुंबईत सुरु करण्यात आल्या. आता एकूण 18 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णांना अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील दुर्गम भागात ही सेवा देण्यासाठी नव्याने 10 ॲम्ब्युलन्स सुरु करण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार मेळघाट येथे पाच आणि पालघर येथे पाच अशा एकूण 10 ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या.
अमरावती जिल्ह्यातील बैरागड, हरीसाल, हातरु, काटकुंभ, टेंभ्रु सोंडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाई गंज आणि पंढरपूर येथे प्रत्येकी एक बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील गंजाड, मालवाडा, मासवन, नंदगाव, तलवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व, मालाड पूर्व, विलेपार्ले पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पश्चिम, बोरीवली पूर्व, अंधेरी पश्चिम, प्रभादेवी जी दक्षिण वॉर्ड, मरीन लाईन्स सी वॉर्ड, माहिम पश्चिम, वांद्रे पश्चिम, विक्रोळी पूर्व, सांताक्रुज पूर्व, कुर्ला पश्चिम, धारावी पोलीस स्टेशन, गोवंडी पश्चिम आणि भांडूप पश्चिम या ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment