उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनमताई महाजन यांनी माननीय रेल्वेमंत्री श्री. पीयूष गोयल यांची भेट घेऊन मतदारसंघातून धावणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा टर्मिनस, खार, बांद्रा, सांताक्रूज, विलेपार्ले ही स्थानके, मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस व कुर्ला स्थानक आणि हार्बर रेल्वे मार्गावरील टिळकनगर व चुनाभट्टी या स्थानकांवरील प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात विविध मागण्या केल्या. यामध्ये कुर्ला स्थानकाच्या पूर्वेच्या बाजूपासून भाभा हॉस्पिटल पर्यंत फूट ओव्हर ब्रिज, विद्याविहार ते लोकमान्य टिळक टर्मिनस फूट ओव्हर ब्रिज, विविध स्थानकांवरील शौचालये, क्रांतीनगर, साबळेनगर तसेच तीन बंगला येथील रेल्वेखात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर राहणाऱ्या राहिवाश्यांच्या निवासाचा प्रश्न, बांद्रा टर्मिनस ते खार रेल्वे स्थानक फूट ओव्हर ब्रिज, सरकते जिने इत्यादी प्रश्नासंदर्भात खासदार पूनमताई महाजन यांनी त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे मा. रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार पूनमताई महाजन यांनी बांद्रा टर्मिनस स्थानकाचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी मा. रेल्वेमंत्री तसेच राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारनेही त्वरित प्रस्ताव रेल्वेखात्यास पाठवण्याचे मान्य केलेले आहे आणि माननीय रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.*
No comments:
Post a Comment