Sunday, 19 August 2018

Chabildas School

छबिलदास शाळेतील १९६८ बॅचच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘स्वरमुग्धा आर्ट्स’ व ‘भारतीय जीवन विमा निगम’ प्रस्तुत ‘तुम्हे याद करते करते’

दादर म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती आणि शिक्षणाचा वारसा जपणारे मुंबईचे मध्यवर्ती केंद्र! याच दादरमध्ये गोपाळ नारायण अक्षीकरांसारख्या तडफदार तरुणाने २ जून १८८९ रोजी एका शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. ती संस्था म्हणजे छबिलदास शाळा. लोकमान्य टिळकांना गुरू मानणाऱ्या अक्षीकरांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय! स्वतः संस्थापक असून निःस्वार्थीपणे अक्षीकरांनी ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट (GEI) नावाचा ट्रस्ट स्थापन केला. आज GEI च्या छत्राखाली २०००० विद्यार्थी शिक्षण घेत असून ५५० शिक्षक व १५० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

या शाळेने समाजाला अनेक कर्तृत्ववान व्यक्ती बहाल केल्या, त्याही विविध क्षेत्रातील! अजित वाडेकर, डॉ. नरेंद्र जाधव, रामदास पाध्ये, दिलीप प्रभावळकर, चंद्रकांत लिमये, बाळ धुरी, विकास सबनीस, विजय गोखले, किशोर रांगणेकर, अजिंक्य रहाणे इ. नामवंत व्यक्तींचा आम्हाला अभिमान वाटतो.

अशा अनेक माजी विद्यार्थ्यांपैकी १९६८ साली ११ वी उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या बॅचचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. या बॅचमधील ‘अ’ वर्गात शिकलेले कृष्णकुमार गावंड, श्रीकांत कुलकर्णी आणि स्व. वसंत खेर यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रचंड योगदान दिले आहे(ऑर्केस्ट्रा, ऑडिओ व्हिडिओ माध्यम) १९७६ साली या त्रयीने ‘सिंफनी’ नावाची संस्था स्थापन करून ‘याद ए. शंकर जयकिशन’ कार्यक्रमाची निर्मिती केली. शुभारंभाच्या प्रयोगाला खुद्द शंकर (जयकिशन) यांनी जातीने हजर राहून आशीर्वाद दिले. त्यानंतर याच संस्थेने ‘झपाटा’ नावाचा कार्यक्रम करून हिंदी मनोरंजन क्षेत्रात क्रांति केली. ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या ‘सिंफनी’च्या कार्यक्रमाने मराठी वाद्यवृंदाला एक वेगळी दिशा दिली.

सध्या प्रा. कृष्णकुमार गावंड, संगीतकार शंकर जयकिशन यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा एकपात्री दृव्‌श्राव्य कार्यक्रम ‘तुम्हे याद करते करते’ सादर करतात. या कार्यक्रमास भारतभर छान प्रतिसाद मिळत आहे. हाच कार्यक्रम १९६८ बॅचच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २२ ऑगस्ट रोजी रात्रौ ८ वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात सादर होणार आहे. या कार्यक्रमातून शाळेसाठी निधी उभारण्याचा हेतू असून कार्यक्रमाचे आयोजन ‘स्वरमुग्धा आर्ट्स’ व ‘भारतीय जीवन विमा निगम’ यांनी केली आहे.

अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी एकत्र येतील आणि याचवेळी शाळेसाठी निधीही गोळा करता येईल असा आमचा विश्वास आहे. अश्या सोहळ्यास सर्व हितचिंतकांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपणही आपापल्या परीने आर्थिक साहाय्य करून शाळेच्या विकासाला हातभार लावावा ही विनंती.
आपले नम्र,
कृष्णकुमार गावंड / श्रीकांत कुलकर्णी
९८१९५१८६५३ /२५२९५३७२/ ९८६९२०२२५१

No comments:

Post a Comment