Friday, 5 February 2016

Yeswant Deo felicitation

शब्दच नसतील तर त्याला गाणं कसं म्हणावं?

आशा भोसले यांची खंत, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव ‘आर.डी. बर्मन जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

गाण्यात शब्दच नाहीत. शब्द नसतील तर त्याला गाणे कसं म्हणावं, असा मर्मभेदी सवाल ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केला. शब्द गाण्याचा आत्मा तर चाल हे शरीर असते. आणि त्यावर साजशृंगार चढवण्याचे काम गायक करतो, अशा शब्दांत आशा भोसले यांनी शब्द आणि सूरांचे नाते अलवार उलगडले आणि नव्या शब्दहीन गाण्यांचा समाचार घेतला.
स्वरदा कम्युनिकेशन अँड इव्हेंट आणि कॅनव्हास कम्युनिकेशन यांच्यावतीने पहिला आर. डी. बर्मन जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना रविवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी आशाताई बोलत होत्या. प्रभादेवी येथील रविंद्र नाटय़मंदिरात हा सोहळा रसिकांच्या तुफान गर्दीत रंगला. यावेळी आशाताईंनी ‘मुन्नी बदनाम हुई’, धूम धूम आणि है है... असे अर्थहिन शब्द असलेल्या  गीतांमुळे संगीताला धर्म राहिलेला नाही, अशी खंत यावेळी व्यक्त केली. यशवंत देव यांच्याकडून संगीताचे खूप बारकावे शिकले. आजही ‘आ’ लावताना किंवा ‘सा’ लावताना देवांनी सांगितलेल्या सूचना पाळते. आवाज कसा लावून घ्यायचा, तान कशी द्यायची, याची शिकवणी देवांनी दिली, जोपर्यंत मी गात राहीन तोपर्यंत या गोष्टी सांभाळणार, असे आशाताईंनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. जीवनाला वेढून टाकण्याऱया आणि दिव्यत्वाची प्रचिती देणाऱया व्यक्तींपैकी देवसाहेब असून त्यांच्याप्रमाणे दुŠख मनात ठेवून जीवनगाणे गायचा कानमंत्र आशाताईंनी रसिकांना  दिला.
सत्काराला उत्त्तर देताना यशवंत देव यांनी आशा भोसले यांच्या संगीत साधनेचे कौतुक केले. आशा भोसले नुसते गात नाहीत, तर गायलेले रसिकांपर्यंत पोचलं की नाही, ते बघतात. ‘आशा भोसले नाव, जणू आनंदाचे गाव, मर्मबंधातील ठेव जणू’ अशा शब्दांत आशाताईंच्या गाण्याचे वर्णन केले. गाणे हा योग आहे, तो योगायोगाने येत नाही. गाणे अशी गोष्ट आहे की स्वर्गातल्या देवापर्यंत पोचली पाहिजे, आशाताईंच्या गाण्यांनी ते करून दाखवले, असे गौरवोद्गार देव यांनी काढले.
आर. डी. बर्मन आणि यशवंत देव हे दोघेही संशोधक संगीतकार आहेत. दोघांनी नवनवीन प्रयोग, स्वतŠचे कौशल्य वापरून अजरामर गीते निर्माण केली. दोघांचाही मी फॅन आहे. त्यामुळे यशवंतर देवांना मिळणाऱया आर. डी. बर्मन पुरस्कारासाठी उपस्थित राहण्याचा आनंद काही औरच आहे, अशा भावना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मॅजिकल पंचम ही सांगीतिक मैफील रंगली. कार्यक्रमाला  शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय पोतनीस, शिवसेना उपनेते आणि श्री एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, विमा कर्मचारी सेनेचे गोपाळ शेलार, पत्रकार हार्दिक हुंडीया आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment