Friday, 5 February 2016

Innogrations of Natyarang festival



नाट्यरंग महोत्सवाचे उद्घाटन

यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होणे हा गौरव सर्व समावेशक रंगभूमीमुळे प्राप्त झाला असून रंगमंच म्हणजे मंतरलेल्या फळ्या असतात.त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा.त्याचे चांगले फळ तुम्हाला नक्कीच मिळेल असा मौलिक सल्ला अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी दिला.पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित नाट्यरंग महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान रवींद्र नाट्यमंदिरात हा महोत्सव पार पडणार आहे.यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडेही प्रमुख पाहुणे म्हून उपस्थित होते.

यावेळी अरुण काकडे म्हणाले कि तीन वर्षांपूर्वी या कला अकादमी मध्ये केवळ व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असत,जेव्हा मी संमेलनाध्यक्ष होतो तेव्हा मी अध्यक्षीय भाषणामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता.त्यांनतर दोनच महिन्यांमध्ये  प्रायोगिक नाटकांसोबतच  नृत्य,संगीत असे कार्यक्रमही पार पडू लागले.अकादमी याचा अर्थच मुळात शैक्षणिक संस्था असतो.त्यामुळे सगळ्या कला या ठिकाणी एकत्र नांदायला हव्यात,असे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी सांगितले.

यावेळी पु.ल देशपांडे यांच्या स्मरणार्थ असलेल्या या वास्तूत गंगाराम गवाणकर यांनी पु.लंच्या आठवणींना उजाळा देत,आज त्यांच्यामुळेच आपण इथवर येऊ शकलो अशी कृतज्ञता व्यक्त केली..त्यांनी सांगितले कि,या नाटकाचे ६० प्रयोग झाल्यानंतर निर्मात्याला तोटा होऊ लागला,म्हणून आम्ही पुण्यात या नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरवले.टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या प्रयोगाला पु.ल देशपांडे,सुनिता देशपांडे,वसंतराव देशपांडे अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.पुणेकरांना मालवणी भाषेत असलेल्या नाटकाचे संवाद समजावेत म्हणून आम्ही काही बदलही केले होते

या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर पु.ल देशपांडे यांनी आमच्या सगळ्यांचे  कौतुक केले आणि या नाटकामध्ये एक छोटीशी भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या या आशीर्वादाच्या कौतुकपूर्ण शब्दांनी इतिहास घडला.अशाप्रकारे रंगभूमीशी श्रध्देने,निष्ठेने वागलात तर हा मंतरलेला रंगमंच तुम्हाला नक्कीच सामावून घेईल असे मार्गदर्शन गवाणकर यांनी तरुण कलाकारांना केले.

या महोत्सवाची सुरवात राज्यनाट्य स्पर्धेत गौरवलेल्या पारितोषिक विजेत्या 'शेक्सपियर गेला उडत आणि  उदयोन्मुख नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी आविष्कार संस्थेने आयोजित केलेल्या 'नाटककारांच्या शोधातया उपक्रमांतर्गत लिहलेले 'अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय !!'या नाटकांनी झाली. सहा फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता  मानाची लेखक संघटना आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेत गौरवलेली ‘बॉम्ब चिकि चिकि बॉम्ब’ ही पारितोषिकप्राप्त एकांकिका नाट्यरुपात सादर होईल,तर संध्याकाळी साडेसहा वाजता हिंदी रंगभूमीवर विशेष गाजत असलेले रंगबाज संस्थेचे 'बडे मियाँ दिवानेहे हिंदी नाटक सादर होईल.

रविवार सात फेब्रुवारीची सकाळ ‘मिकी माऊस छोट्या भीमची धम्माल’ आणि  ‘फुग्यातला राक्षस’ या राजू तुलालवार यांच्या विशेष गाजलेल्या बालनाट्यांनी रंगणार आहे.सकाळी दहा वाजता हे प्रयोग सुरु होतील. दुपारी बारा वाजता राज्य बाल नाट्य स्पर्धेत प्रथम आलेले 'डराव डरावहे नाटक प्रेक्षकांना पाहता येईल. बऱ्याच कालावधीपासून संगीत नाटक महोत्सवात  दाखवावे अशी प्रेक्षकांकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन 'संगीत जय जय गौरी शंकर'हे रसिक प्रेक्षकांचे अमाप प्रेम लाभलेल नाटक संध्याकाळी चार वाजता सादर होईल. महोत्सवाची सांगता झी गौरव सर्वोत्कुष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या 'गोष्ट एका शाळेचीया नाटकाने होईल.  या सर्व नाटकांचे प्रयोग विनामुल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.तेव्हा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी या  महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने केले आहे.


No comments:

Post a Comment