Monday, 14 November 2022

 प्रदर्शनापूर्वीच 'सनी' हाऊसफुल


मराठी सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि तो शो हाऊसफुल झाला आहे. नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोची तिकीटविक्री एका ॲपद्वारे प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि अवघ्या काही वेळातच हा शो 'हाऊसफुल' झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता 'सनी'च्या दुसऱ्या शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले. ठाण्यातही पेड प्रिव्ह्यू शोचे आयोजन करण्यात आले असून तिथेही 'हाऊसफुल'चा बोर्ड लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'सनीला  मिळालेले हे प्रेक्षकांचे प्रेम पाहून, 'सनी' बॉक्स ऑफिसावर धमाका करणारा हे नक्की! 


प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''पेड प्रिव्ह्यू शोचा आम्ही एक प्रयोग करून पाहिला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. खरंतर आम्ही एकाच शोचे आयोजन केले होते, परंतु प्रेक्षकांची इतकी गर्दी पाहून आम्ही आणखी एक शो ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून भारावून गेलोय. जसा सकारात्मक प्रतिसाद 'झिम्मा'ला दिला, मला आशा आहे, 'सनी'लाही प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीनं स्वीकारतील. 


'सनी'ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणतो, '' माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. 'सनी' प्रेक्षकांना आवडतोय. जसं प्रेम प्रदर्शनापूर्वी दिलं आहे, तसंच प्रेम प्रदर्शनांनंतरही द्याल, याची खात्री आहे. घरापासून दूर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा 'सनी' आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय. 


ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत.

No comments:

Post a Comment