Friday, 8 February 2019

१५ मार्च पासून महाराष्ट्रात लागू होणार छत्रपती शासन


पोस्टर रीलीज करताना मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या समवेत चित्रपटाचे  लेखक_दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे व सहनिर्माते अमर पवार


१५ मार्च पासून महाराष्ट्रात लागू होणार 'छत्रपती शासन' 

प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी  करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे "छत्रपती शासन" चित्रपट होय.  भविष्यातील खरी ताकद असलेल्या तरुण पिढीचा डळमळीत होणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारा परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा आहे. महाराजांचे विचार हे आजच्या काळात प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी साकारण्यात आलेला प्रयत्न म्हणजे "छत्रपती शासन". या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा.खा.श्री. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच पार पडला. उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील त्यांचेच आहेत. प्रथेप्रमाणे एखाद्या सिनेमाचा मुहूर्त सिनेक्षेत्रातील नामांकित मंडळी, राजकारणी अथवा इतर मान्यवरांच्या हस्ते केला जातो. मात्र या सिनेमाच्या टीमने अशा पारंपरिक प्रथेला बगल देत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. ''छत्रपती शासन'' सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त पहिल्यांदाच स्पॉट दादा योगेश मर्कड यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला होता. अभिनेता  मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असून सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, विष्णू केदार, राहूल बेलापूरकर, पराग शहा, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, अभय मिश्रा, मिलिंद जाधव यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार  डॉ. विनायक पवार, नंदेश उमप, दीपक गायकवाड, राजन सरवदे यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना नंदेश उमप, रोहित नागभिडे, सचिन अवघडे, अभिजित जाधव, राजन सरवदे यांनी संगीत दिलं आहे. गायक नंदेश उमप, उर्मिला धनगर, जान्हवी प्रभू अरोरा, अभिजित जाधव, राजन सरवदे या गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला आहे. बाल कलाकार श्रीशा म्हेत्रे, राजवर्धन दुसाने, रोमित भुजबळ आणि रेवा जैन यांच्या खुमासदार अभिनयाची झलक यातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निम्मिताने १५ मार्च पासून महाराष्ट्रात 'छत्रपती शासन' लागू होणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

No comments:

Post a Comment