*शापित गंधर्व ..... डीडी*
कोलंबस म्हटलं की आपल्याला काय आठवतं ? कोलंबसाने लावलेला अमेरिकेचा शोध !
एक मराठी माणूसही असाच अवलिया होता. ज्याचे उपकार आपल्यावर निरंतर राहतील व त्या ऋणात राहण्यासारखं दुसरं सुख नाही. साक्षात *गानकोकिळेचा, गानसम्राज्ञीचा* शोध लावणारा तो अवलिया माणूस होता *ज्येष्ठ संगीतकार श्री दत्ता डावजेकर उर्फ डीडी.*
डीडींचं बालपण फारच हलाखीत गेलं. वयाच्या चौथ्या वर्षी आई देवाघरी गेली. वडील तमाशात तबला वाजवित त्यामुळे घराकडे पूर्ण दुर्लक्ष !
छोटा दत्ता बुध्दीने अतिशय तल्लख ! एक्स्ट्रा ऑर्डिनरी. शिक्षणाची नितांत आवड. इंजिनीयर व्हायची महत्त्वाकांक्षा ! वयाच्या पाचव्या वर्षी, १९२२ साली दत्ताने छोट्याशा *साबणाच्या डबीत रेडिओ* तयार करण्याची किमया केली होती. १९२४ साली लंडनमध्ये मॅकॅनो कंपनीने इलेक्ट्रिक सर्किट बनविण्याची एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत सात वर्षाच्या दत्ताने पाठविलेल्या सर्किटला *५० पौंडांचे प्रथम पारितोषिक* मिळालं.
एका वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला दत्ता त्यावेळी लोकांच्या घरची धुणीभांडी करून, केरकचरा काढून मिळेल त्या अन्नावर आपल्या पोटाची खळगी भरत होता. दिवस जात होते. शिक्षण कधीच सुटलं होतं. त्याची खंत होतीच. परंतु जगाच्या शाळेत नूतनवीन शिकण्याची त्याची उर्मी काही कमी झाली नव्हती.
डीडी तसेच ज्येष्ठ भावगीत गायक श्री गजाननराव वाटवे आणि इतर मित्र तेव्हां पुण्यात एकत्र रहात असत. तेव्हां वाटव्यांचं *वारा फोफावला* हे भावगीत जनमानसात अतिशय लोकप्रिय झालं होतं. एके दिवशी डीडी सुबोध मुखर्जी या निर्माता-दिग्दर्शकाकडे काम मागायला गेले. तेथून आल्यावर ते वाटव्यांना प्रामाणिकपणे म्हणाले की *अरे वाटवे ! तुझं "वारा फोफावला" चं संगीत "माझं" आहे असं मी सांगितलं व मला पिक्चर मिळालं. तू रागावू नकोस रे बाबा !*
त्यावर वाटवे म्हणाले की *डावजेकर, तू काहीसुद्धा मनाला लावून घेऊ नकोस. ती चाल माझीही नाही. ती बाबूराव गोखल्यांची आहे !*
डीडींचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २० रूपये पगार मिळत असे. १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे "म्युनिसिपालिटी" ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली.
डीडींची कन्या व नामवंत हिंदी-मराठी पार्श्वगायिका *डॉ रेखा दत्ता डावजेकर* उर्फ *डॉ सौ अपर्णा मयेकर* यांनी आपल्या संगीतकार, कवी, चित्रकार, संशोधक पित्याच्या सांगितिक, कौटुंबिक तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना दिलेला उजाळा म्हणजेच ही *ज्योतीने तेजाची आरती.*
प्रश्न : डॉ अपर्णाताई, एक हरहुन्नरी, सृजनशील, हळवा कलाकार म्हणून आम्ही दत्ता डावजेकर उर्फ डीडींना ओळखतो. आपल्या या कनवाळू, अजातशत्रू पित्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?
*डॉक्टर अपर्णा मयेकर :* मास्टर विनायक दिग्दर्शित करीत असलेल्या एका चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन माझे वडील दत्ता डावजेकर उर्फ डीडी करीत होते. एके दिवशी एका चौदा वर्षे वयाच्या हडकुळ्या, दोन वेण्या घातलेल्या फ्रॉकमधील मुलीची ऑडीशन घेण्यासाठी विनायकांनी डीडींना सांगितले. डीडी त्या मुलीची ऑडीशन घेऊ लागले आणि काही मिनिटांतच डीडी पळत पळत मास्टर विनायकांकडे आले व म्हणाले, *"विनायक, मागेल तेव्हढे मानधन द्या. पण ह्या मुलीला हातची जाऊ देऊ नका. असा गाता गळा यापूर्वी मी ऐकलेला नाही !"*.
त्यावर मास्टर विनायक हंसत म्हणाले की *"अहो डीडी, ती मास्टर दिनानाथांची मुलगी आहे, लता !"*
अशा रितीने लता दीदींचं संगीत क्षेत्रात आगमन झालं. लता दीदींचं हिंदीतील पहिलं गाणं *आपकी सेवा में* या चित्रपटातील "पा लागू कर जोरी" तर मराठीतील पहिलं गाणं *माझं बाळ* या चित्रपटातील "चला चला नवबाला" आहे. या दोन्ही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे.
एव्हढेच नव्हे तर आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा, पं वसंतराव देशपांडे, माणिक दादरकर उर्फ माणिक वर्मा, प्रेमनाथ, अनुराधा पौडवाल या गायक/गायिकांना तसेच पृथ्वीतलावर भगवान श्रीकृष्णाच्या बांसरीचे कॉपी राईट्स सांभाळणारे सुप्रसिद्ध बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना पहिला ब्रेक दिला तो आदरणीय डीडी उर्फ दत्ता डावजेकर यांनी.
सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक *पं वसंतराव देशपांडे* यांना "झांजीबार झांजीबार" या गीताने पहिला ब्रेक देणारे आमचे डीडी.
सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक व संगीतकार *पं जितेंद्र अभिषेकी* यांना लोकसंगीताचा बाज असलेले *गोमू माहेरला जाते रे नांखवा* हे सुपरहिट गीत बळेच गायला उद्युक्त करणारेही डीडीच.
सुप्रसिद्ध गायिका *माणिक दादरकर उर्फ सौ माणिक वर्मा* यांची HMV ची पहिली ध्वनिमुद्रिका डीडींच्या संगीत दिग्दर्शनाखाली निघाली.
प्रख्यात हिंदी अभिनेता आणि खलनायक *प्रेमनाथ* याला "गोवळकोंडा का कैदी" या चित्रपटात प्ले बॅक ची संधी डीडींनी दिली.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मास्टर विनायकांच्या *प्रफुल्ल पिक्चर्स* मध्ये असतांना डीडी, लतादीदी व इतर उत्साही माणसे फावल्या वेळात चक्क आट्यापाट्या खेळायचे.
आशाताईंनी लतादीदींचे तत्कालिन मॅनेजर श्री भोसले यांच्याशी लग्न केल्यावर त्या उभयतांना आपल्या पुण्यातील घरात दोन महिने आसरा देणारेही आमचे डीडी.
माझ्या आईने गरोदर असताना *दत्त रघुनाथ कुमठेकर यांची "आभाळाची सावली"* ही कादंबरी वाचली होती. त्या कादंबरीत रेखा नांवाचं डॉक्टरचं कॅरॅक्टर होतं. आमच्या आईला हे कॅरॅक्टर फारच आवडलं. तिने डीडींना सांगितले की *आपल्याला जर मुलगी झाली तर आपणही तिचं नांव रेखा ठेवायचं आणि तिला मोठी डॉक्टर करायचं !*
माझा जन्म झाल्यावर डीडींनी माझं नांव रेखा ठेवलं. स्वत:ला उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले ही खंत मनात असल्याने त्यांनी आम्हां मुलांच्या शिक्षणावर सारं लक्ष केंद्रित केलं. आम्ही डीडींची मुले चिकित्सक शाळेत पहिला नंबर कधीच सोडत नसू. डीडींची आम्हाला ओपन ऑफर असे की आम्ही जेवढे परसेंटेज मिळवू तेवढे रूपये डीडी त्याकाळी आम्हाला बक्षीस देऊ करत.
१९७१ साली मी रेखा दत्ता डावजेकर *M.B.B.S*. झाले. माझा भाऊ सुध्दा इंजिनिअर झाला. परंतु डीडींची बुध्दी आम्हां मुलांपेक्षाही तल्लख होती. *भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर बनविण्याचा मान डीडींकडे जातो*. त्यांनी अनेक इलेक्ट्रॉनिक वाद्यांची निर्मिती केली.
डीडी हे काळाच्या खूपच पुढचे संगीतकार होते. गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे हे मराठी चित्रपट सृष्टीतील त्रिकूट जगजाहीर आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपट या तिघांनी मिळून सादर केले. पण जेव्हां *पाठलाग* या चित्रपटाची जुळवाजुळव राजा परांजपे करत होते तेव्हा संगीत दिग्दर्शनासाठी त्यांनी डीडींना पाचारण केलं. या सस्पेन्स (गुढकथा) चित्रपटासाठी निर्मात्याचं बजेट कमी असल्याने डीडींनी कमीतकमी म्हणजे फक्त ५ वाद्ये वापरून गीतांना संगीतबद्ध केलं. या चित्रपटातील आशाताईंचे *या डोळ्यांची दोन पांखरे* हे गीत सुपरहिट ठरले. हा वाद्यमेळ ऐकून भलेभले संगीतकार चक्रावून गेले.
चित्रपटांना बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आमच्या डीडींचा हातखंडा. केवळ हलणारी चित्रे पाहून डीडी स्वरलिपी तत्काळ तयार करायचे आणि किती सेकंदाचा पिस कोणी वाजवायचा हे त्या त्या वादकाला सांगायचे. आणि ते नेहमीच अचूक असे.
हार्मोनियम, तबला, दिलरुबा, जलतरंग, ग्लॉक्स, क्ले व्हायोलिन, पियानो, सिंथेसायझर इत्यादी वाद्यांवर डीडींची हुकुमत होती. तसेच क्षणार्धात स्वरलिपी (नोटेशन्स) लिहिण्यात डीडी वाकबगार होते. त्यामुळेच सी. रामचंद्र, रोशन, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी अशा दिग्गज संगीतकारांकडे डीडी सहाय्यक संगीतकार म्हणून काम पाहू लागले. या संगीतकाराच्या अनेक अजरामर गीतांचे संगीत संयोजन डीडींनी केले आहे.
जेव्हां डीडींची स्वत:ची चाल असे तेव्हा चाल केल्यावर डीडी ती मला गायला सांगत. माझ्याकडून गाऊन घेतल्यावर त्या चालीत आवश्यक ते फेरबदल करून मग ती चाल मुख्य गायिकेकडून गाऊन घेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संगीतकार सी रामचंद्र यांच्या सुप्रसिद्ध *"अनारकली"* चित्रपटामधील *जाग दर्द-ए-इश्क जाग* या गीताचं संपूर्ण संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे.
संगीतकार मास्टर कृष्णराव यांना *किचकवध* चित्रपट मिळाला. या चित्रपटातील *धुंद मधुमती रात रे* ह्या गीताची चाल खरंतर डीडींची आहे. ह्या गीताची एक मजेशीर गोष्ट आहे. ह्या गीताच्या रिहर्सलसाठी लतादीदी व मास्टर कृष्णराव आमच्या गिरगांवातील भिमराव वाडीतील घरी आले होते. स्वत:ची चाल असल्यामुळे डीडींनी रिहर्सलच्या आधी हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं व चालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या. लतादीदी रिहर्सल करीत असतांना थोड्या वेळाने डीडी सिगारेट आणण्यासाठी जागेवरून उठले. लतादीदींना कारतो कळल्यावर त्या म्हणाल्या की *खाली माझा ड्रायव्हर जयसिंग उभा आहे. मी त्याला सिगारेट आणायला पाठविते.* त्यानंतर लतादीदी आमच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभ्या राहून जयसिंगला हाका मारू लागल्या. *जयसिंग ! जयसिंग !!* कल्पना करा. गिरगांवांत *साक्षात कोकिळेचा आवाज* ऐकून गिरगांवकर स्तिमित होऊन वर पाहू लागले व लतादीदी भिमराव वाडीत आल्या आहेत ही बातमी गिरगांवात सर्वदूर पसरली व जो तो आमच्या भिमराव वाडीकडे धावू लागला.
डीडींनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी *थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले*. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. "आली दिवाळी मंगलदायी", "कुणि बाई, गुणगुणले", "गेला कुठे बाई कान्हा", "थांबते मी रोज येथे" व "तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला" ही त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते.
*भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी* हे गदिमांनी लिहिलेले "पाहू रे किती वाट" ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडी उत्कृष्ट कविता करायचे. त्यांच्या असंख्य कविता प्रसिद्ध आहेत. नामवंत गीतकार व कवी ग दि माडगूळकर उर्फ गदिमा हे आपल्या कोणत्याही काव्यात फेरफार चालवून घेत नसत. अपवाद फक्त डीडी. *डीडींची काव्यप्रतिभा जाणून असल्याने गदिमांनी फक्त डीडींना काव्यात फेरफार करण्याची मूभा दिली होती.*
*या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती* (चित्रपट - पाठलाग, गायिका: आशा भोसले), *गोमू माहेरला जाते हो नाखवा* (चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी), *बाई माझी करंगळी मोडली* (चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले), *आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही* (चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर), *गंगा आली रे अंगणी* (चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई), *रामा रघुनंदना* (चित्रपट: सुखाची सावली – गायिका: आशा भोसले), *ऊठ शंकरा सोड समाधी* (चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर) ही डीडींची काही गाजलेली गाणी.
आमचे डीडी अतिशय मितभाषी व मृदू स्वभावाचे. दुसऱ्याच्या चांगल्या गुणांची पारख करणारे आणि त्याबद्दल चारचौघांत प्रशंसा करणारे. *हा खेळ सावल्यांचा* ह्या चित्रपटाला खरं तर डीडी संगीत देणार होते. नंतर त्यांना कळलं की आता त्याचं संगीत दिग्दर्शन हृदयनाथ मंगेशकर उर्फ बाळ करणार आहे. डीडींना हे कळल्यावर त्यांची उस्फूर्त प्रतिक्रिया होती *अरे वा ! बाळ म्युझिक डिरेक्ट करतोय कां ? बेस्ट ! बाळ छान म्युझिक करतो. तो ह्या गीतांना न्याय देईल. त्याला माझ्या तर्फे आशिर्वाद !*. यापेक्षा संत या शब्दाला दुसरा पर्याय आहे कां ?
डीडींचं प्रथम प्राधान्य अभ्यासाला नंतर इतर गोष्टींना. हौस म्हणून गाणे ठीक आहे पण व्यवसाय म्हणून नको असे ते म्हणत. मी मेडिकलला असतांना हृदयनाथ मंगेशकरांनी *"भावसरगम* कार्यक्रमात गाशील कां ?" म्हणून मला विचारले. डीडींनी सांगितले "मुळीच नाही. पहिला अभ्यास. तूला डॉक्टर व्हायचंय त्याच्यावर लक्ष केंद्रित कर."
मी गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. पं जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मी गंडा बांधलाय. शोभा गुर्टू, वसंतराव कुलकर्णी या गुरूंकडेही मी शिकलेय. गझल गायन मी गोविंदप्रसाद जयपुरवाले यांच्याकडे शिकलेय. गिरगांवातीलच सुप्रसिद्ध गायक गोविंद पोवळे हे माझे सुगम संगीत (लाईट म्युझिक) क्षेत्रातील गुरू.
लहानपणी स्वत:च्याच संगीत दिग्दर्शनाखाली गाण्यासच डीडींची मला अनुमती असे. अपवाद फक्त संगीतकार वसंत पवारांचा आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा. वसंत पवारांचा आणि डीडींचा स्नेह. वसंत पवारांच्या "डोंगरची मैना" या चित्रपटातील एकच गाणं गाण्यास डीडींनी मला अनुमती दिली. सुप्रसिद्ध गायक बालकराम वरळीकर यांच्याबरोबर मी एक द्वंद्वगीत गायले. ज्येष्ठ संगीतकार श्री श्रीनिवास खळे यांच्या *जिव्हाळा* या चित्रपटातील *या चिमण्यांनो, परत फिरा रे !* ह्या गीतातील ४ कडव्यांपैकी दोन कडवी मुले गच्चीवर पतंग उडवत असतांना गातात. तर उरलेली दोन कडवी आई मुलांना घरी परत बोलावण्यासाठी गाते. यातील आईची दोन कडवी लतादीदींनी गायिली तर मुलांच्या दोन कडव्यांपैकी एक कडवं मी गायले. चित्रपटात फक्त लतादीदींचीच दोन कडवी ठेवण्यात आली.
संगीतकार सी रामचंद्र *आशा* नावाच्या चित्रपटाला म्युझिक देत आहे. डीडी त्यांचे सहाय्यक होते. एकदा सी रामचंद्र, डीडी आणि गीतकार राजेन्द्र कृष्ण कारमधून जाताना सी रामचंद्र डीडींना म्हणाले की "अरे दत्ता, ह्या पिक्चरमध्ये आपल्याला एक वेस्टर्न साँग घ्यायचंय." त्यावर डीडी म्हणाले की मी रेडिओवर एका संगीतिकेला संगीत देतोय. त्यात मी स्वत: एक गीत लिहिलंय. त्या गीताचे शब्द आहेत *इना मिना मोना बोस*. ह्या गीताचं संगीत मी वेस्टर्न स्टाईलमध्ये दिलंय. असं म्हणून डीडींनी ते गीत सी. रामचंद्रना वेस्टर्न स्टाईलमध्ये गाऊन दाखवले. सी रामचंद्रना ते गीत विलक्षण आवडले व फक्त शब्द बदलून तेच गीत डीडींच्याच वेस्टर्न स्टाईलमध्ये *आशा* चित्रपटात समाविष्ट झाले. त्या सुपरहिट गीताचे बोल होते *इना मिना डिका...*.
*माझं लग्न सुप्रसिद्ध सतार वादक श्री अरविंद मयेकर यांचेशी ५ जून १९७२ रोजी झालं.* ते पं. जितेंद्र अभिषेकी यांचे उजवे हात. डीडींच्याही अनेक रेकॉर्डींग्जमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या काळच्या नटसम्राट, गुंतता हृदय हे, कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा, रायगडाला जेव्हा जाग येते, मन पांखरू पांखरू, लेकुरे उदंड झाली, इत्यादी अनेक सुपरडुपर हिट नाटकांचं बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या मिस्टरांचं आहे. *लेकुरे उदंड झाली* या नाटकाच्या प्रोज-कम-चालीत अरविंद मयेकरचा सिंहाचा वाटा आहे असे त्याचे संगीतकार पं जितेंद्र अभिषेकी आवर्जून उल्लेख करीत. कॉन्सर्ट्सच्या निमित्ताने त्यांनी देशविदेशात लतादीदी, सुमन कल्याणपूर, मुकेजी यांच्याबरोबर असंख्य दौरे केले आहेत. अशा रितीने माझ्या माहेरी व सासरी मी संगीतात चिंब न्हाऊन गेलेय.
एकदा संगीतकार सी रामचंद्र काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते. तेव्हा ते डीडींना म्हणाले की *थाकीन (म्हणजे मी)* ला मी "शारदा" पिक्चरमध्ये प्ले बॅक साठी घेतोय. "शारदा" चित्रपटातील पहिल्याच सीनमध्ये छोटी मीना कुमारी दोन श्लोक गाताना दाखवलीय. हे दोन्ही श्लोक मी गायलेयत. ते माझं पहिलं रेकॉर्डिंग. बॉम्बे लॅबमध्ये हे रेकॉर्डिंग झाल्यावर मी रूमच्या बाहेर आले. तेथे एक गोल चेहऱ्याचे गृहस्थ उभे होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले, *बहुतही मिठी आवाज है ! बहुत गाओगी !* डीडींनी स्टुडिओच्या काचेतून हे दृष्य पाहिले व ते धावत बाहेर आले व मला म्हणाले, *अगं त्यांच्या पाया पड. ते महम्मद रफी आहेत.* त्या वयात मला महम्मद रफी वगैरे कुठलं ठाऊक असायला ? अक्कल आली तेव्हा मात्र स्वत:चा खूपच अभिमान वाटला.
*शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा* या गाण्यांत मी आशाताईंबरोबर गायलेय. मला न्यायला डीडी चिकित्सक शाळेत आले होते. आम्ही स्टुडिओचा जीना चढत असतांना वर उभ्या असलेल्या अभिनेता देव आनंदने मला शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पाहिले. तो पटकन पुटपुटला *आजकलकी लडकियां स्कूल बंक करके हिरो हिरॉईन देखने आते है !* असं बोलून तो आत रेकोर्डिंग स्टुडिओत निघून गेला डीडींना भारी राग आला. ते मला म्हणाले की *त्यांच्याशी मला बोलावं लागेल*!
डबींग झाल्यावर देव आनंद बाहेर आला. डीडींनी त्यांना थांबवलं व म्हणाले, *आपने मेरी बेटी के बारे मे जो बोला वो गलत है ! मेरी बेटी होनहार है और स्कूल में हर बार फर्स्ट आती है ! वोह डॉक्टर बनने वाली है ! आज आशाजी के साथ ड्युएट गाने के लिए मै उसे डायरेक्ट स्कूल से लाया हूं !*
देव आनंद अवाक होऊन डीडींकडे पहात राहिले व sorry म्हणाले.
आशाताईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवून *शेपटीवाल्या प्राण्यांची ...* हे ड्युएट माझ्याबरोबर गायलं व *प फ ब भ* ही अक्षर आल्यावर माईक कसा क्रॉस धरायचा हेही शिकवलं.
एकदा रंगभवन ह्या ओपन थिएटरमध्ये महाराष्ट्र सरकारचा अवार्ड फंक्शनचा कार्यक्रम होता. हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी पहिल्या रांगेत बसले होते. मी त्यांच्यासमोर *जीवलगा* गायले. लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. थोड्या वेळाने हृदयनाथ व लतादीदी दोघंही स्टेजवर आले. हृदयनाथ मला म्हणाले, *अगं तुझी हिम्मतच कशी झाली की साक्षात सरस्वती समोर बसलेली असतांना "जीवलगा" गायची ? तूला भिती वाटली नाही ?*
मी फक्त हंसले अन् म्हणाले, की *हे डीडींचे मार्गदर्शन !*
लहानपणी एकदा आमच्या गायन क्लासचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम लक्ष्मीबागेत होता. डीडी मला म्हणाले की तू *ओ चांद जहा वोह जाये...* हे गाणं गुरुपौर्णिमेला गा.
लक्ष्मीबागेत हॉल खचाखच भरला होता. मला भिती वाटली. डीडी मला बाजूला घेऊन म्हणाले, *थाकीन ! असं समजायचं की गाण्यातली अक्कल फक्त तूला आहे. समोर जे बसले आहेत त्याना कोणाला गाण्यातलं काहीही कळत नाही. हा मंत्र सारखा मनात ठेव.*
मी बिनधास्त होऊन गायले व तीनवेळा वन्स मोअर घेतला. *Positive Thinking हे डीडींचं वैशिष्ट्य.*
डीडी टॅप डान्स फार म्हणजे फारच छान करायचे. "गजाभाऊ" चित्रपटात डीडी आणि बेबी आचरेकरने टॅप डान्स केलाय.
चित्रकला, रेखाचित्र डीडी लिलया काढायचे. आमच्या भिमराव वाडीत दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धा, नाटके, सांगितिक कार्यक्रम होत असत एक मॅगझिन ही निघत असे. त्याचे मुखपृष्ठ दरवर्षी डीडी चितारीत.
एकदा डीडींनी काळ्या कार्बन पेपरवर तेली खडूने *मंगळावरचा माणूस* हे चित्र काढले. एकदा गदिमा आमच्या घरी आले असतांना त्यांनी हे चित्र पाहिले व डीडींकडून मागून घेऊन पुण्यातील आपल्या *"पंचवटी"* बंगल्यात लावले.
प्रश्न : तुमचा स्वत:चा संगीत प्रवास कसा झाला ?
*डॉक्टर अपर्णा मयेकर* : मी अत्यंत समाधानी आहे. मी १४ भाषांमध्ये सुमारे ५००० हून अधिक गाणी गायलेय. प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषांमध्ये मी पार्श्वगायन केलंय. मराठीत डीडी, बाबूजी, खळेकाका, वसंत पवार, विश्वनाथ मोरे, अनिल-अरुण, इत्यादी तर हिंदीत भप्पी लाहिरी, सी रामचंद्र, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रविंद्र जैन, दिलीप सेन-समीर सेन, इ अनेक संगीतकारांकडे मी गायलेय. उच्चार अस्खलित व्हावेत म्हणून मी उर्दू शिकले. मी उर्दूत कविताही करते.
भप्पी लाहिरींच्या "गैर कानूनी" या चित्रपटात "तुम जो परदा रखोगे" हे गाणं लतादीदी गाणार होत्या. पडद्यावर गोविंदा व श्रीदेवी होते. लता दिदी उपलब्ध नसल्याने भप्पीदांनी मला तात्पुरतं डबींगसाठी बोलावलं. मी श्रीदेवीचा पार्ट लतादीदींसाठी डब केला. काही दिवसांनी लतादीदी टेकसाठी गायला आल्या. माझं डब झालेलं गाणं ऐकल्यावर त्या भप्पीदांना म्हणाल्या की *थाकीन ने अच्छा गाया है ! यही गाना रहेने दो !* यापेक्षा मोठी दाद कोणती असेल ? भप्पीदाही म्हणाले की "लतादीदीने फर्स्ट टाईम किसी और सिंगर को इतना अॅप्रिसिएट किया हो !"
मी भप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मन्ना डे, नितीन मुकेश, आनंद-मिलींद यांच्याबरोबर परदेश दौरे केले आहेत.
परंतु माझे प्राधान्यक्रम ठरलेले होते. प्रथम मुले, त्यानंतर रुग्णसेवा व स्वान्तसुखाय गाणं. सध्या मी *सतरंगी आशा* हा माझा कार्यक्रम करते. यात माझा सलग ३० गीतांत सहभाग असतो. मध्येमध्ये काही ड्युएट्स असतात.
प्रश्न : आपले वडील एव्हढे ज्येष्ठ संगीतकार, कवी, चित्रकार, संशोधक (क्ले व्हायोलिन व सिंथेसायझर) होते. *१९६२ पासून सलग पाच वर्षे सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार* मिळवूनही त्यांच्या या श्रमांचं चीज झालं नाही असं तुम्हाला वाटत नाही कां ?
*डॉक्टर अपर्णा मयेकर* : होय. वाटतं. पण त्याला कारण त्यांचा मृदू, भिडस्त, अल्पसंतुष्ट स्वभाव. "ठेविले अनंते तैसेची रहावे" ही वृत्ती. हे गाणं *मी स्वरबध्द केलंय* असं कधीही कुणालाही न सांगण्याची प्रवृत्ती. पराकोटीची सहनशीलता. दुसऱ्याला माफ करण्याकडे कल. मी तर त्यांना *शापित गंधर्व* म्हणते. त्यांना पुनर्जन्म नाही. *त्यांचं संगीत, त्यांच्या बुध्दीचा अंश आणि त्यांची सहनशीलता माझ्यात उतरलीय हे माझं भाग्य !*
(टिप : हा लेख माझं नाही. लेखकाचे नाव ठावूक नाही, परंतु माहितीपूर्ण वाटला म्हणून कॉपी केला)
#दत्ताडावजेकर #संगीतकार