मोहन सिंग तू दुर्दैवी होतास !
५० वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम करून अतिशय सर्वसामान्य मृत्यू तुझ्या वाट्याला आला. आपल्या वयातही जवळपास ५० वर्षांचे अंतर आहे, पण गमतीदार क्षणांमध्ये तुला 'तू' संबोधण्याचा जो मी आनंद घेतला आहे, त्याचे साक्षीदारही आपणच आहोत. तुझ्या कामाचा आलेख बघता तुझ्या अंत्यसंस्काराला हिंदी चित्रपटसृष्टीतील चार दोन जुने कलावंत, निर्माते, वितरक तरी येतील, असे मला कायम वाटायचे. पण व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुझ्या वाट्याला आलेले दुर्दैव, या वैभवाची प्रचिती देणार नाही, याची जाणीव तुला होती. आणि काल तेच झाले.
अमिताभ बच्चन यांना नागपूरच्या सीताबर्डीची ओळख करून देणारा आणि रेल्वेच्या टीसीला "हरिवंशराय बच्चन का लडका है, कल स्टार बनेगा. ख्याल रखना", असे सांगणारा तूच तो मोहनसिंग अरोरा. दारासिंग नागपुरात आले की हॉटेलमधून थिएटरच्या मॅनेजरला फोन करून सांगायचे "सरदार को जरूर भेजना". मग तुम्ही सोबत जेवायला जायचे. देव आनंद नागपुरात येण्यापूर्वी विजय आनंद तुला फोन करून सांगायचे "देव आ रहा है, उसका सब इंतजाम करना" आणि मग तू देव आनंदचा नागपूरचा "गाईड" व्हायचास. प्रेम चोप्रा "टाईम्स अॉफ इंडिया"साठी वितरण वसुली एजंट म्हणून काम करायचे, तेव्हा नागपूर, गोंदिया आणि अमरावतीला वसुलीसाठी यायचे, हे तूच ठामपणे सांगितले होते. खुद्द प्रेम चोप्रांनी ते कबुल केले. धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, बडजात्या कुटुंब, खय्याम अशी कितीतरी नावे घेता येतील, ज्यांचा केवळ चित्रपटाच्या प्रमोशनपुरता तुझा संबंध नव्हता, तर त्याही पलीकडे ऋणानुबंध होते. तुला स्वतःचे मार्केटिंग करता आले असते तर तू यांच्यातील अनेकांशी अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात राहिला असता. पण, फकिरी वाट्याला आली आणि ती तू आनंदाने स्वीकारली. झोपडीत राहून कोण पुसणार होते तुझ्या वैभवाला? तरीही तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी घेतली होती तुझी दखल. राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवात जितेंद्रच्या हस्ते तुझा सत्कार झाला. पंचशील टॉकीजमधील तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पत्रकार म्हणून डोळ्यात पाणी येण्याचे क्षण जवळपास नाहीच येत वाट्याला. पण, त्या दिवशी आले. सत्कारासाठी तुझा पंचशीलच्या स्टेजवर आमंत्रित केले तेव्हा अंधारात जितेंद्रचे लक्ष गेले नाही. आणि जसा तू पायऱ्या चढून वर आला तसे जितेंद्र जागेवरून उठले आणि "सरदार?” हा एकच प्रश्नांकित शब्द त्यांनी उच्चारला आणि तुला कडाडून मिठी मारली. हा प्रसंग लिहीतानाही कंठ दाटून येतो सरदार. कुण्या मोठ्या नटाचे निधन झाले की मी तुला फोन करायचो आणि तू कोरिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर पासून मेक-अपमन पर्यंत प्रत्येकाची नावे सांगायचा. तुला आज खरं सांगतो... तू अशी डिटेल माहिती दिली, की मी अॉफिसला येऊन गुगलवरून त्याची खात्री करून घ्यायचो. माझा तुझ्यावर विश्वास होता, तरीही. प्राण यांच्या एका नातेवाईकाचे धरमपेठमध्ये चपलेचे दुकान होते, अमजद खान यांच्या आईचे निधन झाल्यामुळे राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचे नागपुरातील चित्रीकरण रद्द झाले... हे सारे तूच सांगायचास आणि तेही ठामपणे. देशभरात फ्लॉप गेलेले चित्रपट दिग्गज निर्मात्यांनी नागपुरात वाजवून घेतले आहेत, ते तुझ्या प्रमोशनच्या स्टाईलमुळे. आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन चित्रपटांचे प्रमोशन होते, तू पूर्वी स्वतःच सायकलने सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये जाऊन पत्रकार परिषदेचे निमंत्रण द्यायचास. पत्रकारितेच्या क्षेत्रातील लक्ष्मणराव जोशी सर (Laxman Joshi), विजय पणशीकर सर, प्रकाश दुबे सर यांची नावे कायम तुझ्या ओठावर असायची. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्याबाबत तू सतत विचारायचास. एकदा पंचशील सिनेमागृहाच्या बाहेर तू माझा हात घट्ट पकडला आणि "बीस रुपये है क्या?” असे विचारले. मी 30 रुपये दिले, तर तू त्यातील दहा परत केले. मला गंमत वाटली. वाटलं काही काम असेल आणि सुटे नसतील. पण, दुसऱ्या दिवशी कळले की तुझ्याकडे खरच पैसे नव्हते आणि लुनामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुला हवे होते. नंतर काही दिवसांनी कळले, की तू एका मॅगझीनला चित्रपटांचा किती व्यवसाय झाला, याचे रिपोर्टींग करतो आणि तुला दर सहा महिन्यांनी त्याचे मानधन मिळते. तेव्हाही तू एेंशीच्या घरात होतास. पण एका संस्थेला पुरस्कारासाठी तुझे नाव सुचवले तेव्हा "कॅश नही होना, बहुत कमा लिया" असे आयोजकाला सांगणारा मोहनसिंग मी बघितला आहे. "झुंड"च्या शुटींगसाठी अमिताभ नागपुरात होते, तेव्हाही तुला म्हटले होते भेटण्याबाबत. पण, तू म्हणाला "भिड में नही जा सकता मै". अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल. डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. सुनिती देव (Suniti Deo) यांनी एकदा मला या अनुभवाचे काय करायचे हे सांगितले होते. त्यालाही पाच वर्षे झाली. तू जिवंत असताना ते झाले असते, तर आनंद झाला असता. तुझे मेहाडिया चौकातील कार्यालय, पंचशीलचे व्यवस्थापक राजा लहेरिया यांच्यामुळे झालेली आपली भेट, त्याठिकाणी महेश (Mahesh Tickley Photojournalist) आणि मी केलेले एक शुटींग, तुझ्या मुलीचे आणि त्या पाठोपाठ बहिणीचे निधन... वगैरे वगैरे. तुझ्या झोपडीच्या छतातून सतत कचरा पडायचा आणि तरीही ताईने बनवलेले पराठे मी व महेश त्या धुळीसकट आनंदाने खात होतो. खूप आहे रे माझ्याकडे. पण, "मेल्यावर माणसाची किंमत होते" हा नियम मोडायचा नसतो. तुझी-माझी शेवटची भेट किती ह्रदय पिळवटून टाकणारी होती, याचा संदीप (Sandeep Soni) सोनी साक्षीदार आहे. त्या भेटीचे वर्णन लिहीताना माझी बोटं अडखळत आहेत. त्यासाठी वेगळे निमित्त शोधेन. तुर्तास एवढेच.
श्रद्धांजली वाहणार नाही... मी तुला जिवंत ठेवणार आहे !
तुझा,
नितीन
(Not original, copied from WhatsApp)